News Flash

विधानसभा निवडणुकीत सावनेरमध्ये घमासान?

दोन महिन्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सावनेर मतदारसंघात घमासान होण्याची चिन्हे दिसू लागली असून गेल्या निवडणुकीच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी भाजप चाचपणी करीत आहे.

| July 26, 2014 01:48 am

दोन महिन्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सावनेर मतदारसंघात घमासान होण्याची चिन्हे दिसू लागली असून गेल्या निवडणुकीच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी भाजप चाचपणी करीत आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला मिळालेले मताधिक्य पाहता भाजपच्या गोटात विश्वासाचे वातावरण असतानाच काँग्रेसमध्ये निराशेचे वातावरण पसरले आहे. काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून बंडखोरी होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.  
आमदार सुनील केदार यांना उमेदवारी देऊ नये, असे काँग्रेसच्या एका गटाचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेसने उमेदवारी न दिल्यास केदार अपक्ष म्हणून रिंगणात राहणार असल्याचे त्यांचे समर्थक सांगत आहेत. काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली तर बंडखोरी होईल, असेही बोलले जात आहे. त्यामुळे सध्यातरी काँग्रेसच्या वरिष्ठांकडे पेच निर्माण झाला आहे. दुसरीकडे आशिष देशमुख यांना उमेदवारी देऊ नये, असा मतप्रवाह भाजपमध्ये आहे. त्यांना उमेदवारी दिल्यास गेल्यावेळच्या निवडणुकीप्रमाणेच भाजपला पराभव पत्करावा लागेल, असा तर्कही दिला जात आहे. सावनेर मतदारसंघातून १९८५ आणि १९९० मध्ये काँग्रेसचे रणजित देशमुख विजयी झाले. १९९५ मध्ये झालेल्या निवडणुकीत अपक्ष सुनील केदार यांनी रणजित देशमुख यांचा पराभव केला. १९९९ मध्ये झालेल्या निवडणुकीत सुनील केदार यांचा भाजपचे देवराव आसोले यांनी पराभव केला. २००० मध्ये झालेल्या निवडणुकीत केदार यांनी १९९९ च्या पराभवाचा बदला आसोले यांचा पराभव करून घेतला. २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसकडून लढलेले केदार यांनी भाजपचे आशिष देशमुख यांचा ३ हजार ३४५ मतांनी पराभव केला.
केदार आतापर्यंत चारवेळा विधानसभेची निवडणूक लढले. त्यात त्यांना एकदा पराभव बघावा लागला तर तीनदा विजय प्राप्त झाला. परंतु नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे कृपाल तुमाने यांनी या मतदार संघात २९ हजार ९३९ मताधिक्य मिळवले. त्यामुळे भाजपच्या गोटात विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. या मताधिक्यामुळे भाजपचा उमेदवार निवडून येईलच, असे गणित मांडले जात आहे. त्यामुळे भाजपकडून उमेदवारी मागणाऱ्यांची यादी मोठी आहे. त्यामध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, सोनबा मुसळे, माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रमेश मानकर व अशोक धोटे यांचा समावेश आहे. परंतु भाजपकडून याहीवेळी आशिष देशमुख यांनाच उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा आहे. त्यामुळे भाजपमधीलच काही शिलेदार नाराज झाले आहेत. या मतदारसंघातील जातीय समिकरण बघता सोनबा मुसळे यांना उमेदवारी देणे योग्य राहील, असा मतप्रवाहही पक्षात आहेत. परंतु गुणवत्ता पाहूनच उमेदवारी दिली जाईल, असा स्पष्ट इशारा वरिष्ठांनी दिल्याने कुणीही तोंड उघडावयास तयार नाहीत. त्यामुळे ज्याला उमेदवारी मिळेल, त्याचे काम करू असा पवित्रा भाजपच्या शिलेदारांनी घेतला आहे.
दुसरीकडे काँग्रेसमध्येच सुनील केदार यांच्या विरोधात वातावरण निर्मिती होत आहे. नागपूर जिल्हा सहकारी बँक डुबल्याने त्यात आणखी भर पडत आहे. त्यांना उमेदवारी दिल्यास, यावेळी काही खरे नाही, असा इशारा काँग्रेसमधीलच एक गट वरिष्ठांना देत आहे. असे झाल्यास स्वतंत्रपणे लढण्याची तयारी केदार यांनी सुरू केली आहे. तसे निवडणूक कशी जिंकावी, हे त्यांना चांगलेच अवगत आहेत. गेल्या पाच वर्षांपासून ते कार्यकर्ते व मतदारांच्या सतत संपर्कात आहे. काँग्रेसतर्फे माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. अरविंद लोधी आणि पवन जयस्वाल यांचीही नावे चर्चेत आहेत. केदार हे कार्यकर्त्यांना वापरून घेतात. कोणत्याही कार्यकर्त्यांला त्यांनी मोठे केले नाही. गेल्या निवडणुकीत दिलेली आश्वासने त्यांनी पूर्ण केली नाहीत, असे आरोप काँग्रेसमधीलच एका गटाचे कार्यकर्ते करीत आहेत. अशा स्थितीत त्यांना उमेदवारी देऊ नये, असेही या गटाचा आग्रह आहे. गेल्या निवडणुकीतही या गटाचे हेच म्हणणे होते. यानंतरही केदार निवडून आलेत. केदारांना उमेदवारी न दिल्यास काँग्रेस शून्य होईल. सावनेरमध्ये काँग्रेसकडे केदारांशिवाय दुसरा पर्याय नाही, असे त्यांचे समर्थक ठामपणे सांगतात. या मतदार संघातील सध्याची स्थिती बघिता भाजप आणि काँग्रेसमध्ये काहीच ‘ऑलवेल’ नसल्याचे स्पष्ट होते. उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये खुली तर भाजपमध्ये छुपी बंडखोरी होण्याची शक्यता आहे. बहुजन समाज पक्ष, गोंडवाना गणतंत्र पक्ष, समाजवादी पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही मैदानात उतरणार असल्याने या निवडणुकीत रंगत वाढणार असल्याचे चित्र सध्यातरी दिसून येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2014 1:48 am

Web Title: bjp enthusiasm congress frustration in saoner assembly
टॅग : Bjp,Congress
Next Stories
1 पाच वर्षांत १०९ कोटींच्या बनावट नोटा निदर्शनास
2 आघाडी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणावर शेतकरी नेते नाराज
3 ‘विद्यार्थ्यांच्या माध्यमातून प्लास्टिक मुक्तीचा संदेश घरोघरी पोहोचवा’
Just Now!
X