बिघडलेली कायदा व सुव्यवस्था तसेच महिलांवरील अत्याचाराविरोधात शनिवारी भारतीय जनता पार्टीच्या वतीने करवीर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या वेळी सत्तारूढ आघाडी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून नायब तहसीलदार घोरपडे यांना निवेदन देण्यात आले.     
महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून खून, दरोडे, चोरी तसेच सोनसाखळी हिसकावून घेणे यासह महिलांवर अत्याचार व बलात्काराच्या गुन्ह्य़ांत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. गुन्हेगार मोकाट फिरत असून कायद्याचा कोणताही धाक गुन्हेगारांना राहिलेला नाही. काही दिवसांपूर्वी शहरातील दीड वर्षांच्या बालिकेवर बलात्काराची घटना, हुपरी-रांगोळी येथे देखील अल्पवयीन मुलीवरील बलात्काराची घटना घडली आहे. राज्यात बेकायदेशीर दारू व मटका यांचे खुलेआम अस्तित्व जाणवत आहे. शासनाने गुटखाबंदी कागदोपत्री केली असली, तरी राजरोस गुटखा विक्री चालू आहे. राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी राज्यात महिलांवरील बलात्कारासंदर्भात ५ फास्ट ट्रॅक कोर्ट नेमण्याची घोषणा केली होती. परंतु अद्याप यावर कार्यवाही झालेली दिसून येत नाही.     
या विरोधात भाजपाने शनिवारी शिवाजी चौकातून जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा शिवाजी चौकातून तहसील कार्यालयावर गेला. जिल्हाध्यक्ष जाधवयांनी निष्क्रिय आघाडी सरकारच्या विरोधात घणाघाती टीका केली. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी राजीनामे द्यावेत, अशी मागणी केली. या वेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य अ‍ॅड.संपतराव पवार, मधुमती पावनगडकर यांनी देखील आघाडी सरकारचे वाभाडे काढले.