आगामी निवडणुकीत लोकसभेची नांदेडची जागा भाजपच लढविणार आहे. या जागेबाबत अदलाबदल होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर फडणवीस प्रथमच नांदेडला आले. त्यांचा दौरा राजकीय स्वरूपाचा नव्हता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमासाठी ते येथे आले होते. पत्रकारांशी संवाद साधताना पक्षांतर्गत बाबी किंवा लोकसभेची निवडणूक, पक्षाचा उमेदवार यावर बोलण्याचे त्यांनी टाळले. पक्षातील एका शिष्टमंडळाने सकाळपासून दुपापर्यंत फडणवीस यांना घेरले होते. त्यामुळे त्यांना एका माजी राज्यमंत्र्याची सदिच्छा भेट टाळावी लागली.
संघाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर फडणवीस यांनी भाजपचे जिल्हा कार्याध्यक्ष राम पाटील रातोळीकर यांच्या निवासस्थानी भेट दिली. तत्पूर्वी ज्येष्ठ पत्रकार सुधाकरराव डोईफोडे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. तेथे झालेल्या चर्चेतून भाजप नांदेडची जागा अन्य मित्रपक्षाला सोडणार नाही, हे स्पष्ट झाले.
मधल्या काळात शिवसेनेचे प्रभारी संपर्कप्रमुख सुहास सामंतर यांनी संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य केल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांत चलबिचल सुरू झाली. पण नांदेडची जागा आम्हीच लढविणार, असे फडणवीस यांच्याप्रमाणेच नवे सरचिटणीस संभाजी पाटील निलंगेकर यांनीही स्पष्टपणे सांगितले. दुसरे सरचिटणीस सुरजितसिंह ठाकूर हेही सतत नांदेड जिल्हय़ाच्या संपर्कात असून पक्षातर्फे लवकरच पूर्णवेळ निरीक्षकाची नियुक्ती केली जाणार असल्याचे त्यांनी अलीकडेच येथे सांगितले होते.
येत्या काळात काँग्रेसविरुद्ध आरपारची लढाई करण्याचा संकल्प फडणवीस यांनी व्यक्त केला. नजीकच्या काळात पुन्हा नांदेड दौऱ्यावर येणार असून हा दौरा पूर्णत: राजकीय स्वरूपाचा राहणार आहे. त्या दौऱ्यात स्वतंत्र वेळ काढून तरुणांशी ते संवाद साधणार आहेत. रविवारच्या दौऱ्यात नांदेड लोकसभा मतदारसंघात पक्षाचे ‘हक्काचे’ मतदान किती? त्याखेरीज जास्तीची किती मते मिळवावी लागतील? काँग्रेसच्या परंपरागत मतांमध्ये किती फूट पडणे आवश्यक आहे? तसेच ‘एमआयएम फॅक्टर’चा परिणाम आदी बाबी स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून जाणून घेतल्या.