इतर पक्षांतील मातब्बरांना गळाला लावायचे आणि विजयाचे गणित जुळवून आणायचे, हा राज्यातील विधानसभा निवडणुकीत राबविलेला फॉम्र्युला ठाणे जिल्ह्य़ात येत्या वर्षभरात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जसाच्या तसा उतरविण्याची व्यूहरचना भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी आखल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा गणेश नाईक यांच्या भाजप-प्रवेशाच्या चर्चेला एकीकडे ऊत आला असताना ठाणे जिल्ह्य़ातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका लक्षात घेऊन भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुरुंग लावण्याचे बेत आखले आहेत. विशेष म्हणजे, येत्या आठ महिन्यांवर येऊन ठेपलेल्या कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर तेथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकांना गळाला लावण्याचे बेत आखले जात असून मनसेचे तब्बल १२ नगरसेवक आतापासूनच भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.   
लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही नरेंद्र मोदी यांचा करिश्मा कायम राहिल्याने भाजपला राज्यभरात सर्वाधिक जागांवर विजय मिळवता आला. ठाणे, कल्याण, डोंबिवली यांसारख्या शहरांमध्ये वर्षांनुवर्षे शिवसेनेचा वरचष्मा राहिला आहे. तसेच जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पाळेमुळे घट्ट रुजली आहेत. असे असताना विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी अशा दोन्ही पक्षांतील मातब्बरांना धक्का देत भाजपने जिल्ह्य़ात सर्वाधिक जागांवर विजय मिळवला. भाजपच्या झंझावातापुढे ठाणे शहरासारखा बालेकिल्ला शिवसेनेला राखता आला नाही, तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन पक्षांचा तर अक्षरश: पालापाचोळा झाला. नवी मुंबईत गणेश नाईक यांना भाजपच्या मंदा म्हात्रे यांनी धूळ चारली, तर ठाण्यातही संजय केळकर यांनी शिवसेनेला धक्का दिला.
भाजप जोडो अभियान
या बदललेल्या राजकीय पाश्र्वभूमीवर भाजपच्या स्थानिक नेत्यांनी इतर पक्षांतील नाराजांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू केले असून ठाणे महापालिकेतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील काही वरिष्ठ नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश घेण्यासाठी देव पाण्यात बुम्डवून बसल्याची चर्चा रंगली आहे. नवी मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर आल्या असताना दादा राष्ट्रवादी सोडा, अशी हाक नाईक समर्थक नगरसेवकांनी दिली आहे, तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी राष्ट्रवादी फोडा अभियान सुरू केल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसू लागले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याचा धडाका सध्या लावण्यात आला आहे.  
कल्याण-डोंबिवलीत मिशन मनसे
कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक तोंडावर आली असताना या भागातील मनसेच्या नगरसेवकांना गळाला लावण्याची रणनीती आखण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत मनसेच्या काही नगरसेवकांनी भाजपला मोकळ्या मनाने मदत केल्याचे चित्र दिसून आले. गेल्या महापालिका निवडणुकीत डोंबिवली शहरात मनसेच्या लाटेने भाजपच्या पारंपरिक बालेकिल्ल्यांना धक्का दिला होता. मनसेचे काही नगरसेवक संघ परिवारातील आहेत. त्यामुळे यांपैकी काही नगरसेवकांनी पुन्हा भाजपचा सूर आळवण्यास सुरुवात केली आहे. डोंबिवली, कल्याणमध्ये भाजपचे आमदार आहेत. कल्याण पूर्व भागाचे अपक्ष आमदार गणपत गायकवाड सध्या भाजपच्या दावणीला बांधले गेल्याचे चित्र दिसू लागले आहे. मनसेचे तब्बल १२ नगरसेवक भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा असून मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर हे चित्र बदलेल का, याविषयी येथील राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
सध्या कोण कोणत्या पक्षात जाईल याचा भरवसा नाही. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काही नगरसेवक फुटण्याची शक्यता आहे. तशी कुणकुण आम्हाला पण आहे. पण एवढय़ा मोठय़ा प्रमाणात नगरसेवक फुटणार नाहीत. राज ठाकरे यांनी विकासाचा आराखडा तयार केला आहे. त्याची जाणीव नागरिकांना आहे. त्यामुळे मनसेला कोणताही धोका नाही. आम्ही आमच्या ताकदीने नक्कीच मोठय़ा फरकाने विजयी होऊ, असा विश्वास एका मनसेच्या नेत्याने व्यक्त केला. भाजपच्या एकाही नेत्याने याविषयी अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.