संपन्न तालुका म्हणून प्रसिध्द असलेल्या निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत परिसरासही यंदा टंचाईने घेरले असून शहरातील काही जणांकडून पाण्याचा चक्क काळाबाजार होत असल्याची चर्चा आहे. हा काळा बाजर तसेच जमिनीतून मोठय़ा प्रमाणावर होणारा पाण्याचा उपसा थांबविण्यासाठी सोमवारी पिंपळगावातील नागरिक संघटीत झाले आहेत. नागरी वसाहतींमध्ये कुपनलिका खोदण्यास प्रतिबंध करावा तसेच या कुपनलिकेतील पाण्याची टँकरसाठी होणारी विक्री थांबवावी, अशी मागणी सरपंचांकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
माजी सरपंच भास्कर बनकर यांनी टंचाईमुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीची गंभीर दखल घेत विविध अधिकाऱ्यांसमवेत ग्रामपंचायतीत चर्चा केली. पाण्याचा काळाबाजार व उपसा थांबविण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. याबाबत सरपंच नंदू गांगुर्डे व उपसरपंच संजय मोरे यांच्यासह शहरातील प्रमुख नागरिकांचे शिष्टमंडळ घेऊन तातडीने जिल्हाधिकारी विलास पाटील यांची भेट घेण्याचे या वेळी ठरविण्यात आले.
मागील वर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने यंदा नोव्हेंबरपासूनच पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. पिंपळगावची तहान भागविण्यासाठी पालखेड धरणातून पाणी पुरवठा होतो. पिंपळगावची वाढलेली लोकसंख्या आणि धरणातून उपलब्ध होणारे पाणी याचा मेळ बसत नसल्याने शहराच्या अनेक उपनगरात नागरिकांनी कुपनलिका खोदल्या आहेत. या कुपनलिकांव्दारे नागरीकांची तहान भागविली जात आहे. शहरातील एक-दोन विहीरींचे पाणीही ग्रामपंचायतीव्दारे काही भागात दिले जात आहे. पिंपळगाव परिसरात अद्याप पाण्याचा स्त्रोत बऱ्यापैकी असल्याने अनेकांनी कुपनलिका खोदण्याचा सपाटा सुरू केला आहे. या कुपनलिकांव्दारे उपलब्ध होणाऱ्या पाण्याची विक्री टँकरसाठी करण्यात येत आहे. या माध्यमातून दररोज हजारो टँकरद्वारे कोटय़वधी लिटर पाणी शहराबाहेर जात आहे. प्रचंड उपसा वाढल्यामुळे पाण्याची पातळी खालावली असून अनेक शेतकऱ्यांच्या विहीरी व कुपनलिकांवर त्याचा परिणाम झाला आहे.
फेब्रुवारीत अशी परिस्थिती असेल तर पुढील चार महिन्यात काय परिस्थिती होईल, याचा विचार करून नागरिकांनी एकत्र येऊन कुपनलिकांची वीज जोडणी तातडीने बंद करण्याची मागणी केली आहे. कुपनलिकेसाठी कोणी वीज चोरी करत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी, तसेच नवीन वीज जोडणी देऊ नये, जूनपर्यंत नवीन बांधकांमाना परवानगी देऊ नये, असे ठराव ग्रामसभेत मांडण्याचे ठरविण्यात आल्याची माहिती भास्कर बनकर यांनी दिली.