मान्सूनने शुक्रवारी संध्याकाळी दमदार हजेरी लावत मुंबईच्या रस्त्यांवर ‘पाणी जाम’ केले. त्यानंतर रविवार आणि सोमवार या दोन्ही दिवशी पावसाने आपला जोर कायम ठेवल्याने रस्ते जलमय झाले. पावसाने दमदार सलामी देत विविध प्रशासकीय यंत्रणांनी केलेले नालेसफाईचे दावे फोल ठरवले.
मुंबई शहरातून उपनगरांकडे जाण्यासाठी पश्चिम व पूर्व द्रुतगती मार्ग यांच्याशिवाय लाल बहादूर शास्त्री मार्ग व स्वामी विवेकानंद मार्ग हे चार प्रमुख रस्ते आहेत. पहिल्या दोन दिवसांतच झालेल्या पावसाने मुंबईचे हे चार ‘हात-पाय’ गारठले. लाल बहादूर शास्त्री मागावर कांजूरमार्ग गांधीनगर भाग, भांडुप-मुलुंड भाग, विक्रोळी स्थानकाजवळील सिग्नल येथे पाणी साचले होते. तर स्वामी विवेकानंद मार्गावरील अंधेरी सबवे, खार सबवे या नेहमीच्या ठिकाणी पाण्यामुळे वाहतूक कूर्मगतीने सुरू होती.
यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांना ‘पाणी जाम’मुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही, असे दावे मुंबईतील विविध प्रशासकीय यंत्रणांनी केले होते. मात्र शुक्रवारी संध्याकाळी जेमतेम दीड तास पडलेल्या पावसाने कधी नव्हे ते पूर्व द्रुतगती मार्गावर कांजूर-भांडुप-मुलुंड या दरम्यान पाणी तुंबून वाहतूक
रखडली. पवईकडून गांधीनगर पुलामार्गे पूर्व द्रुतगती मार्गावर येणाऱ्या गाडय़ांना अध्र्या तासापेक्षा जास्त काळ वाहतूक
कोंडीचा सामना करावा लागत होता. पश्चिम द्रुतगती मार्गाची स्थितीही फारशी वेगळी नव्हती. या पावसाने वांद्रे पूर्व कलानगर ते अगदी जोगेश्वरी-गोरेगाव-मालाडपर्यंत वाहतुकीची कोंडी
झाली होती.
पूर्व द्रुतगती मार्गावरून भायखाळा येथून निघालेल्या गाडीला हिंदमाता, दादर, माटुंगा, घाटकोपर-विक्रोळी, भांडूप येथे पाण्यामुळे खिळ लागत होता. रस्त्यांच्या दुभाजकांच्या बाजूला पाणी तुंबल्याने चारपदरी रस्त्यांवरील केवळ दोनच पदरी रस्ते वाहतुकीसाठी वापरले जात होते. त्यात एखादी बस दुभाजकाच्या बाजूने जोरात गेल्यास पाण्याचा लोंढय़ामुळे दुचाकी वाहनांनी त्रेधातिरपीट उडत होती. गाडीच्या सायलेन्सरमध्ये पाणी शिरू नये, यासाठी वाहनचालक गाडय़ा हळूहळू चालवत होते. त्यामुळेही वाहतूक कोंडी झाली.
शहरातील मुख्य रस्त्यांवर ही अवस्था असताना उपनगरांतील रस्तेही जलमय झाले होते. अनेक उपनगरांतील रेल्वे स्थानकांकडे येणाऱ्या रस्त्यांवर पाणी साचले होते. यात भांडूप, कांजूरमार्ग, घाटकोपर, कुर्ला या स्थानकांचा प्रामुख्याने समावेश होता. त्यामुळे उपनगरातील वाहतूकही खूपच रखडत चालू होती. अनेक रिक्षावाल्यांनी आपल्या रिक्षा रस्त्यांच्या कडेला उभ्या करणे पसंत केल्याने प्रवाशांना गुडघाभर पाण्यातून पायपीट करावी लागली.  ‘नव्याची नवलाई’ असल्याने मुंबईकरांनीही स्वत:ची त्रेधा होत असताना आनंद लुटला. पण पावसाच्या रेटय़ापुढे प्रशासकीय यंत्रणांचा सफाईचा दावा मात्र पुरता कोलमडला.