मुंबई डासमुक्त करण्यासाठी अवलंबलेल्या उपाययोजनांमधील त्रुटी, अधिकारी आणि कामगारवर्गाची उदासीनता, अधूनमधून निर्माण होणारा कीटकनाशकांचा तुटवडा आदी कारणांमुळे पालिकेच्या डास निर्मूलन मोहिमेचा फज्जा उडाला आहे. बोचऱ्या थंडीत मुंबईकर डासांमुळे कमालीचे हैराण झाले आहेत. त्यातच मलेरियासारख्या रोगांमुळे मुंबईकर धास्तावला आहे. डासांच्या निर्मूलनासाठी मध्यंतरी ‘मॉस्क्युटो किलिंग सिस्टिम मशीन’ची मात्रा लागू करण्याचे पालिकेने ठरविले असले तरी कीटकनाशकांना न जुमानणाऱ्या डासांचा या मशीनमुळे संहार होईल का याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.
महापालिका डास निर्मूलनासाठी डासांची शोधमोहीम, डासांची अंडी-अळ्यांच्या नमुन्यांची तपासणी, धूम्रफवारणी, कीटकनाशक फवारणी आदी उपाययोजना केल्या जातात. मलेरियाचे रुग्ण आढळणाऱ्या ठिकाणी डासांचा प्रादुर्भाव झाल्याचा अहवाल कस्तुरबा रुग्णालयातून पालिकेच्या प्रत्येक वॉर्डातील कीटकनाशक विभागाला ई-मेलद्वारे पाठविला जातो. या अहवालाच्या आधारे डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे शोधण्यात येतात. ही ठिकाणे सापडल्यानंतर तेथील डासांची अंडी-अळ्यांचे नमुने शिवाजी मार्केट येथील कीटकनाशक विभागाच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात येतात. प्रयोगशाळेचा अहवाल ४८ तासांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांच्या हाती पडतो. दरम्यानच्या काळात डास निर्मूलनासाठी धूम्रफवारणी आणि कीटकनाशक फवारणी मोहीम हाती घेण्यात येते. त्याचबरोबर झोपडपट्टय़ा, चाळी, बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी साचलेल्या पाण्याचा निचरा करणे, पिंपात साठवलेल्या पाण्यात औषध टाकणे, जनजागृती करणे आदी कामे या विभागाकडून करण्यात येतात. परंतु धूम्रफवारणी आणि कीटकनाशक फवारणीमधील त्रुटी डासांच्या पथ्यावर पडली आहे. मोकळ्या जागेत केलेल्या फवारणीमुळे डास धुरापासून बचाव करीत इतरत्र जातात. त्यामुळे धूम्रफवारणीचा उपयोग होत नाही. झोपडपट्टय़ांमधील दाटीवाटीच्या गल्ल्या, झोपडय़ांमध्ये धूम्रफवारणी केल्यास त्याचा काही अंशी फायदा होतो. झोपडीच्या दरवाजातून आत केलेल्या धूम्रफवारणीनंतर धूर छपरातून बाहेर यायला हवा. तसे झाल्यास गुदमरून डासांना मुक्ती मिळू शकेल. परंतु अशा पद्धतीने फारच कमी प्रमाणात धूम्रफवारणी होताना दिसते.
मुंबईतील २२७ प्रभागांसाठी प्रत्येकी एक धूम्रफवारणी यंत्र उपलब्ध करण्यात आले आहे. धूम्रफवारणी कधी, कुठे करावयाची हे ठरविण्याचे अधिकार स्थानिक नगरसेवकाला देण्यात आले आहेत. तसेच शाखाप्रमुख, समाजसेवकांबरोबर बैठकाही घेतल्या जातात. परंतु अपुरे मनुष्यबळ, धूम्रफवारणी व कीटकनाशक फवारणीतील त्रुटी, अस्वच्छता आदी विविध कारणांमुळे पालिकेची डास निर्मूलन मोहीम निष्प्रभ ठरत आहे.
तोकडे मनुष्यबळ
वरिष्ठ कीटकनाशक अधिकाऱ्याच्या अधिपत्याखाली उपकीटनाशक अधिकारी, तीन सहाय्यक कीटकनाशक अधिकारी, २४ कीटक नियंत्रक अधिकारी, १९९ कनिष्ठ आवेशक, २३ कनिष्ठ आवेशक मूषक आणि सुमारे १३०० कामगार असा एकूण १५५१ जणांचा फौजफाटा पालिकेच्या डास निर्मूलन मोहिमेसाठी झटत आहे.  १९७० सालची लोकसंख्या विचारात घेऊन या कर्मचाऱ्यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात लोकसंख्येत कित्येक पटीने वाढ झाली. परंतु कीटकनाशक विभागातील पदांच्या संख्येत मात्र वाढ करण्यात आलेली नाही. ही मोहीम यशस्वीरीत्या राबविण्यासाठी कर्मचारी भरती करणे आवश्यक आहे.
धूम्रफवारणीसाठी प्रतिदिनी १४,५०० रुपये खर्च
एका धूम्रफवारणी यंत्रासाठी  प्रतिदिनी ३ लिटर २०० मिलीग्रॅम पेट्रोल, ३२ लिटर डिझेल आणि २ लिटर २०० मिलीग्रॅम टायप्रोथोन दिले जाते. डिझेल-टायप्रोथोनचे मिश्रण तयार करून धूम्रफवारणी केली जाते. एका वेळी मशीनमध्ये ४ लिटर मिश्रण भरावे लागते. मशीन सुरू केल्यावर २० मिनिटांमध्ये हे मिश्रण संपते. दिवसभरात आठ वेळा धूम्रफवारणी करण्यासाठी डीझेल आणि टायप्रोथोनचे मिश्रण पुरते. यासाठी पालिकेला प्रतिदिनी प्रतिमशीन सुमारे ४ हजार रुपये खर्च येतो. २२७ प्रभागांतील सर्व धूम्रफवारणी मशीनसाठी प्रतिदिनी पालिका सुमारे ९ लाख ८ हजार रुपये खर्च करीत आहे. त्याशिवाय सहा विभागांमध्ये कार्यरत असलेल्या माउंटन धूम्रफवारणी मशीनसाठी पालिकेला प्रतिदिनी १६० लिटर डिझेल, १८ लिटर पेट्रोल आणि १ लिटर ८०० मिलीलिटर टायप्रोथोनपोटी तब्बल ११,५०० रुपये खर्च येतो.
डासांच्या तीन जाती
साधारणपणे मुंबईत अ‍ॅनासिलिक, एडीस आणि क्युलेक्स अशा तीन जाती आढळतात. त्यापैकी अ‍ॅनासिलिक डासामुळे मलेरिया, तर एडीस डासामुळे डेंग्यू होतो. डास निर्मूलनासाठी उघडय़ा गटारांच्या ढाप्यात, अरुंद बोळांमध्ये, दाटीवाटीने उभ्या असलेल्या लोकवस्तीत धूम्रफवारणी करावी. धूम्रफवारणी योग्य पद्धतीने होत नसल्यास पालिकेच्या वॉर्ड कार्यालयातील धूम्रफवारणी निरीक्षकाकडे तक्रार करावी.