छोटय़ा पडद्यावरील मालिकांमध्ये हजेरी, प्रसारमाध्यमांशी त्यांच्याच कार्यालयात गप्पाटप्पा आदी मार्गाबरोबरच नव्या चित्रपटांच्या जाहिरातीसाठी ‘कॅच देम यंग’ म्हणत बॉलिवूडकर आता मुंबईतील आंतर महाविद्यालयीन महोत्सवांना टार्गेट करू लागले आहे. त्यासाठी चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा एखाददुसरा कलाकार किंवा अख्खीच्या अख्खी स्टारकास्टच महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये उतरविण्याचा फंडा निर्माते अवलंबू लागले आहेत. सिनेमाच्या जाहिरातीच्या निमित्ताने बॉलिवूड कलाकार फुकटात उपलब्ध होत असल्याने महाविद्यालयांनाही हा फंडा पचनी पडतो आहे. त्यामुळे सेलिब्रेटी पाहुण्यांवर खर्च होणारे लक्षावधी रुपये तर वाचतातच. शिवाय सिनेमाच्या जाहिरातीसाठी आलेल्या तारेतारकांच्या नखऱ्यांनाही फारसे तोंड द्यावे लागत नाही. थोडक्यात त्यांचे ठुमकेही फुकटात पाहायला मिळतात.
सिनेमाचा मोठा प्रेक्षक तरूण वर्ग आहे. हा प्रेक्षकवर्ग हेरण्यासाठी आंतर महाविद्यालयीन महोत्सव हे चांगले व्यासपीठ बॉलिवूडकरांना उपलब्ध झाले आहे. सेंट झेवियर्सचा ‘मल्हार’, आर. ए. पोदारचा ‘एनिग्मा’, भवन्सचा ‘दि फेस्ट’ या नुकत्याच होऊन गेलेल्या महाविद्यालयीन महोत्सवांमध्ये बॉलिवूडच्या काही नव्या चित्रपटांची जाहिरात करण्यात करण्यासाठी अशीच तारकामंडळे अवतरली होती. मल्हारमध्ये तर ‘गँड्र मस्ती’ या पुढील आठवडय़ात प्रदर्शित होणाऱ्या हिंदी सिनेमाची सगळीच्या सगळी स्टारकास्ट येऊन गेली. ‘भवन्स’मध्ये नील नितीन मुकेश आणि सोनल चौहान यांनी ‘थ्रीजी’च्या जाहिरातीच्या निमित्ताने हजेरी लावली.
आताचा काळ हा तसा महाविद्यालयीन महोत्सवांचा नाही. म्हणूनच ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर अशा मध्येच पार पडलेल्या पोदारच्या एनिग्मामध्ये एक नव्हे, दोन नव्हे तर तीन चित्रपटांनी जाहिरात करण्याची संधी साधून घेतली. आपल्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘जंजीर’च्या निमित्ताने पीसी उर्फ प्रियांका चोप्रा हिचे पोदारला पाय लागले. तिची जादू ओसरत नाही तर तिचा एकेकाळचा खास मित्र शाहीद कपूर देखील आपल्या प्रदर्शनाच्या मार्गावर असलेल्या ‘फटा पोस्टर, निकला हिरो’ या सिनेमाच्या जाहिरातासाठी पोद्दारच्या एन्गिमामध्ये हजेरी लावून गेला. या शिवाय कपूर घराण्याचा पूत रणबीरही येथे थोडीफार ‘बेशरम’गिरी करून गेला. आता शाहीदचा ‘फटा पोस्टर.’ प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. त्या निमित्ताने शाहीद नेरूळच्या डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तंत्र महोत्सवात येण्याची शक्यता आहे.
‘आमच्याकडे तीन दिवसांच्या महोत्सवादरम्यान आमचे व इतर अभियांत्रिकी महाविद्यालयांचे मिळून तब्बल दीड लाख विद्यार्थी कॅम्पसवर हजेरी लावतात. या तीन दिवसात प्रत्येक दिवशी कोणत्याही वेळेस तब्बल दीड ते दोन हजारांची गर्दी तर कॅम्पसवर नक्कीच असते. त्यामुळे, ‘फटा पोस्टर.’च्या निर्मात्यांना आमच्याकडे येण्यात रस आहे,’ अशी प्रतिक्रिया आयोजनात सहभाग असलेल्या ‘डीवाय’च्या एका विद्यार्थ्यांने सांगितले.
पैसे वाचतात
‘चित्रपटाच्या जाहिरातीच्या निमित्ताने आम्हाला बॉलिवूडचे स्टार्स मिळतात. अन्यथा या स्टारमंडळींना बोलवायचे म्हटले तर आम्हाला दीड ते १० लाख रुपयांपर्यंत पैसे मोजावे लागतात. त्यामुळे, सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने सिनेतारकांना बोलावणे आमच्याही (आयोजकांच्या) पथ्यावर पडते,’ अशी पुष्टी त्याने जोडली