वलयांकित उमेदवारांच्या विविध हालचालींमुळे महानगरपालिका निवडणुकीची रंगत आता वाढू लागली आहे. माजी महापौर तथा राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संग्राम जगताप माळीवाडय़ातून रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे. तसे झाले तर शिवसेनेचे प्रबळ उमेदवार तथा ज्येष्ठ नगरसेवक बाळासाहेब जगताप यांच्याशी त्यांची लढत होईल.
शहराच्या राजकारणात बोराटे-जगताप या संघर्षांला नवे परिमाण प्राप्त होण्याचीच शक्यता या लढतीमुळे आहे. माळीवाडय़ातील प्रभाग क्रमांक २६ हा बोराटे यांचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या वेळी ते शिवसेनेच्या चिन्हावर येथून विजयी झाले होते. मनपाच्या तत्कालीन स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले (राष्ट्रवादी) यांचा त्यांनी पराभव केला होता. या प्रभागातील एक जागा इतर मागासवर्गासाठी (सर्वसाधारण) आणि दुसरी जागा सर्वसाधारण वर्गातील महिलांसाठी राखीव आहे. भाजप-शिवसेना युतीत या दोन्ही जागा शिवसेनेकडे जाण्याची शक्यता व्यक्त होते. त्यानुसार एका जागेवर बोराटे व दुसऱ्या जागेवर शिवसेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम यांच्या पत्नी यांच्या उमेदवारीची तयारी सुरू आहे.
संग्राम जगताप यांनाही आता याच प्रभागाकडे लक्ष वळवल्याचे सांगण्यात येते. त्यांच्या गोटातूनही या हालचालींना दुजोरा देण्यात येतो. त्यांनी यापूर्वीच कुणबी प्रमाणपत्र मिळवले असून, या प्रभागातील आरक्षित जागेवर ते चाचपणी करीत असल्याचे सांगण्यात येते. या चर्चेने राजकीय वर्तुळात सर्वाचेच कान टवकारले आहेत. सारसनगर परिसरातील त्यांचा पारंपरिक व बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा प्रभाग सोडून ते इकडे का लढणार याचे उत्तर मात्र मिळत नाही. वेळप्रसंगी ते सारसनगर व माळीवाडा अशा दोन प्रभागांतून रिंगणात उतरतील असेही सांगण्यात येते.
मधल्या पाच वर्षांचा अपवाद वगळता बोराटे गेल्या २३ वर्षांपासून नगरसेवक आहेत. त्यांचा राजकीय उदयच आमदार अरुण जगताप यांचे खंदे समर्थक म्हणून झाला. मागच्या पाच-सात वर्षांपासून ते जगताप यांच्यापासून दुरावले व आता थेट शिवसेनेत आहेत. मात्र बोराटे-जगताप यांच्यातील जुने नाते लक्षात घेऊनच या संभाव्य लढतीच्या चर्चेने शहराचे लक्ष इकडे केंद्रित होण्याची शक्यता आहे. मात्र जगताप यांचे हे दबावतंत्र असावे असेही काहींना वाटते. माळीवाडय़ात चाचपणी केली तरी ते त्यांच्या पारंपरिक प्रभागातूनच रिंगणात उतरतील असेही सांगितले जाते.