09 March 2021

News Flash

वैद्यकीय महाविद्यालयासाठी बुलढाणा जिल्ह्य़ाला उपेक्षितच ठेवणार काय?

राज्य् नाच्या वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाने जिल्हा तेथे वैद्यकीय महाविद्यालय, या निर्धारित धोरणानुसार चंद्रपूर, गोंदिया व बारामती येथे वैद्यकीय महाविद्यालय जाहीर केले आहे. ही घोषणा करतांना

| December 25, 2012 02:20 am

राज्य् नाच्या वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाने जिल्हा तेथे वैद्यकीय महाविद्यालय, या निर्धारित धोरणानुसार चंद्रपूर, गोंदिया व बारामती येथे वैद्यकीय महाविद्यालय जाहीर केले आहे. ही घोषणा करतांना राज्यात खऱ्या अर्थाने सर्वच क्षेत्रात मागासलेल्या बुलढाणा जिल्ह्य़ासाठी उपेक्षा व प्रतीक्षेचे धोरण अवलंबिण्यात आल्याबद्दल सखेद आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शासनाचे वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांनी वरील घोषणा विधानसभेत केली. यासोबत ते बुलढाणा जिल्ह्य़ालाही वैद्यकीय महाविद्यालय देतील, अशी अपेक्षा होती. माजी आरोग्यमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी बुलढाण्यालाही वैद्यकीय महाविद्यालय देण्याची आग्रही मागणी केली, मात्र पुढच्या टप्प्यात ती पूर्ण केली जाईल, असे आश्वासन देऊन मंत्र्यांनी ही मागणी प्रलंबित ठेवला. खरे म्हणजे, डॉ. राजेंद्र शिंगणे सार्वजनिक आरोग्यमंत्री असतांना त्यांनी येथे हे महाविद्यालय खेचून आणण्याची आवश्यकता होती. स्वत: वैद्यकीय चिकित्सक असलेल्या डॉ. शिंगणेंना त्यावेळी या रास्त अपेक्षेची पूर्तता करता आली नाही. शासनाच्या दप्तरदिरंगाईत हा प्रश्न आता लांबणीवर पडण्याचीच शक्यता निर्माण झाली आहे.
बारामतीपेक्षा बुलढाण्याला वैद्यकीय महाविद्यालयाची अधिक आवश्यकता आहे. सर्वागिण विकास झालेला व खासगी वैद्यकीय महाविद्यालये हाकेच्या अंतरावर असलेला राज्यातील हा श्रीमंत भाग आहे. काका-पुतण्यांनी बारामतीचा विकास करतांना राज्याची मती गुंग करून टाकली आहे. त्या तुलनेत महाराष्ट्राच्या अस्मितेची प्रेरणा असलेल्या राष्ट्रमाता जिजाऊ मॉं साहेबांचे जन्मस्थळ असलेला बुलढाणा जिल्हा विकासापासून क ोसो दूर आहे. नव्वद टक्के  क ोरडवाहू शेतजमीन असलेला हा जिल्हा औद्योगिक व आर्थिक विकासात राज्यात शेवटच्या क्रमांकावर आहे.
या जिल्ह्य़ातील जनतेला वैद्यकीय महाविद्यालयाची नितांत आवश्यकता आहे. जिल्ह्य़ाचे मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहरात वैद्यकीय महाविद्यालय होण्यास अनुकूल परिस्थिती आहे. येथे तिनशे खाटांचे जिल्हा सामान्य रुग्णालय असून अतिशय विस्तीर्ण जागेवर शासकीय क्षय आरोग्यधाम आहे. शासनाच्या निर्णयानुसार हे क्षय आरोग्यधाम आता स्त्री रुग्णालयात परिवर्तित होणार आहे.
त्यामुळे येथे रुग्ण खाटांची संख्या पाचशेवर जाऊ  शकते. या रुग्णालयाला सर्व तालुक्याच्या ठिकाणची उपजिल्हा सामान्य रुग्णालये व ग्रामीण रुग्णालये जोडली गेली आहेत. याचा अर्थ, येथे पायाभूत सुविधा तयार आहेत.
जिल्हा मागासलेला असल्याने गोरगरीब रुग्णांची संख्या लाखोंच्या घरात आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षणासोबत या सोयी सुविधा उपलब्ध होऊ शकतात. वैद्यकीय महाविद्यालयांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा असलेले सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जोडलेले असतात. यात प्रत्येक विभाग स्वतंत्र व सक्षम असतो. त्याचा या जिल्ह्य़ाला चांगला फायदा होऊ शकतो. येथे रुग्णालय प्रशस्त असले तरी वैद्यकीय तज्ज्ञांअभावी अत्यवस्थ रुग्णांना औरंगाबाद किंवा अकोल्याला पाठवावे लागते.
औरंगाबादचे अंतर दिडशे, तर अकोल्याचे अंतर शंभर किलोमीटरहून अधिक आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होते. या सर्व बाबींचा विचार करून राज्य शासनाने यावर्षीच उपरोक्त तीन वैद्यकीय महाविद्यालयांसोबतच बुलढाण्यात वैद्यकीय महाविद्यालय कार्यान्वित करावे, अशी मागणी आहे.
यासाठी जिल्ह्य़ातील दोन खासदार, सात आमदार, विधान परिषदेचे चार आमदार व सर्वच राजकीय पक्षांच्या महत्त्वाच्या लोकप्रतिनिधींनी शासनावर दबाव आणून ही मागणी पदरी पाडून घ्यावी, अशी अपेक्षा आहे.     

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2012 2:20 am

Web Title: buldhana distrect is in waith for medical college
टॅग : Buldhana
Next Stories
1 नगरसेवकांनीच ठरवले कंत्राटदार अन् कामेही परस्पर विकली
2 डॉ. अभय बंग यांना बाबा आमटे मानवता पुरस्कार
3 जलसंधारण विभागाला जाग आली
Just Now!
X