घराचा कडीकोयंडा तोडून घरातील सोन्या-चांदीचे ४४ लाख ५० हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेणाऱ्या अनिल योगिराज बोर्डे या अट्टल घरफोडय़ास प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. पी. शिंदे यांनी अडीच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.  या चोरीमुळे शहरात मोठी खळबळ उडाली होती.
शहराच्या उस्मानपुरा भागातील कुलदीपसिंग महेंद्रसिंग जग्गी यांच्या घरी गेल्या १६ जून २०१२ रोजी ही चोरी झाली होती. घराचा कडीकोयंडा तोडून ४४ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरण्यात आले होते. उस्मानपुरा पोलिसांनी या प्रकरणी १६ जूनला गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अजयकुमार पांडे यांच्याकडे या गुन्हय़ाचा तपास देण्यात आला. त्यांनी या गुन्हय़ातील आरोपी अट्टल घरफोडय़ा अनिल बोर्डे यास २८ जूनला अटक केली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता क्रांती चौकाजवळील झाशीच्या राणीचे मैदान येथील हौदात पुरलेले २७ लाख ५८ हजार ४१५ रुपये किमतीचे १ किलो ८ ग्रॅम सोन्याचे दागिने पोलिसांना त्याने काढून दिले. या प्रकरणी बोर्डेविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या खटल्याचा निकाल बुधवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी शिंदे यांनी दिला. बोर्डे यास २ वर्षे ६ महिने सक्तमजुरी व १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. केशवराव साळुंके यांनी काम पाहिले.