२०१४-१५ हे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास अवघ्या पंधरा दिवसांचा कालावधी बाकी असल्याने विद्यार्थ्यांंना भेडसावणाऱ्या समस्यांवर पुन्हा चर्चा सुरू झाली असून शालेय बस सेवा हा त्यात कळीचा मुद्दा आहे. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यावर विविध कारणे पुढे करत शालेय बस सेवा बंद करण्याचे प्रकार मागील वर्षी शहरात घडल्याने अशी सेवा एकदा सुरू केल्यावर निदान वर्षभर तरी ती बंद करता येणार नाही, अशी ताकीद प्रादेशिक परिवहन विभागाने प्रत्येक शाळेला देण्याची मागणी पालकांकडून होत आहे.
जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू होणार असल्याच्या पाश्र्वभूमीवर गैरप्रकार रोखण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने आतापासूनच पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. शालेय विद्यार्थी वाहतुकीचे वैध योग्यता प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांविरोधात परवाना निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा विभागाने याआधीच दिला आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी झालेल्या शाळा व्यवस्थापनाच्या आणि खासगी कंत्राटदारांच्या ६०२ शालेय बसेसपैकी १७५ गाडय़ांचे योग्यता प्रमाणपत्र वैध नाही.  त्यामुळे शाळा व्यवस्थापन, महाविद्यालयीन संस्था, खासगी कंत्राटदार यांनी योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी वाहने कार्यालयात सादर करण्याचे आवाहनही विभागातर्फे करण्यात आले आहे. अशा प्रकारचे योग्यता प्रमाणपत्र न घेता शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक होत असल्याचे आढळून आल्यास त्या वाहनांविरोधात कारवाई करण्याचा इशाराही विभागाकडून देण्यात आला आहे. राज्य शासनाच्या शालेय बस धोरणान्वये शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतुकीसाठी प्रत्येक शाळेत एक परिवहन समिती गठीत करणे आवश्यक आहे. त्यानुसार नाशिकमधील अनेक शाळांमध्ये अशी समिती मागील वर्षी स्थापन करण्यात आली होती. परंतु तरीही काही शाळांमध्ये विद्यार्थी बस वाहतुकीच्या समस्या कायम राहिल्याचे दिसून आले.
विद्यार्थी वाहतुकीसंदर्भात शालेय बससेवेच्या अनुषंगाने काही शाळांकडून प्रत्येक वर्षी धरसोड वृत्ती दाखविण्यात येत असल्याने विद्यार्थी व पालक पुरते बेजार झाल्याचे मागील वर्षी दिसून आले. वास्तविक शाळेत विद्यार्थी प्रवेश घेतात, त्याचवेळी त्यांना व पालकांना शाळेची बससेवा आहे किंवा नाही याची माहिती देणे आवश्यक आहे. काही शाळा शैक्षणिक वर्षांस सुरूवात झाल्यानंतर एक-दोन महिन्यांनी बससेवा सुरू करावी की नाही याचा निर्णय घेतात. तोपर्यंत खासगी वाहतूकदारांच्या कार्यशैलीची पुरेपूर जाण असलेल्या पालकांना ‘गॅस’वरच राहावे लागते. काही नामवंत शाळांचे प्रशासन बससेवा सुरू करण्याचा निर्णय उशिराने घेत असल्याने तोपर्यंत वाट पाहून वैतागलेले पालक नाईलाजाने खासगी रिक्षा, टॅक्सीचा आधार घेण्याच्या निर्णयाप्रत आलेले असतात. शालेय बससेवेसंदर्भात प्रत्येक वर्षी उशिराने निर्णय घेणारी शाळा म्हणून ओळख निर्माण झालेल्या शहरातील एका शाळेने मागील वर्षी शैक्षणिक वर्षांच्या मध्यावरच बससेवा बंद करण्याचा धोकादायक निर्णय घेतला होता. आपल्या या निर्णयामुळे बससेवेने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आणि पालकांवर शैक्षणिक वर्षांच्या मध्यावर कोणते संकट कोसळेल याचा बिल्कूलही विचार शालेय प्रशासनाकडून करण्यात आला नव्हता. शालेय प्रसासनाच्या या निर्णयामुळे ऐनवेळी रिक्षा किंवा टॅक्सी दररोजच्या विद्यार्थी वाहतुकीसाठी मिळणेही पालकांना मुश्किल झाले होते. अखेर जादा पैसे दिल्यानंतर खासगी वाहतूकदार विद्यार्थी वाहतुकीसाठी तयार झाले होते.
या पाश्र्वभूमीवर प्रादेशिक परिवहन विभागाने शालेय विद्यार्थी बस वाहतुकीसंदर्भात शासनाने आखून दिलेल्या सर्व नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करतानाच बससेवा एकदा सुरू केल्यावर किमान शैक्षणिक वर्ष पूर्ण होईपर्यंत कोणत्याही कारणास्तव बंद करता येणार नाही, अशी अट टाकणे आवश्यक असल्याचे मत पालकांनी व्यक्त केले आहे.