मुंबईतील मालमत्ता क्षेत्रातील मंदीचे मळभ आणखी दाटत चालले असून नरिमन पॉइंट आणि वांद्रे-कुर्ला संकुल या दोन प्रमुख व्यापारी केंद्रांमधील कार्यालयीन जागेचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील मानांकन खाली घसरले आहे. कार्यालयीन वापरासाठी जगातील सर्वात महाग परिसरांच्या यादीत वांद्रे-कुर्ला संकुल ११ व्या स्थानावरून १५ व्या स्थानावर तर नरिमन पॉइंट २६ व्या स्थानावरून ३२ पर्यंत खाली घसरले आहे. या दोन्ही ठिकाणी नऊ टक्के कार्यालये वापराविना रिकामी पडून असल्याची माहिती उजेडात आली आहे.
नरिमन पॉइंट परिसरात ६० लाख चौरस फूट कार्यालयीन जागा आहे. पैकी पाच लाख ४० हजार चौरस फूट जागा भाडेकरूंअभावी रिकामी पडून आहे. तर वांद्रे-कुर्ला संकुलात ५८ लाख चौरस फूट कार्यालयीन जागा आहे. पैकी पाच लाख २२ हजार चौरस फूट जागा वापराअभावी रिकामी पडून आहे. त्यातही येत्या वर्षभरात वांद्रे-कुर्ला संकुलातील कार्यालयीन जागेत दोन लाख चौरस फुटांची भर पडणार आहे, असे ‘जोन्स लांग ला सेल’ या मालमत्ता क्षेत्रातील संस्थेचे संशोधन विभागप्रमुख आशुतोष लिमये यांनी सांगितले.
वांद्र, कुर्ला आणि कलिना या भागाचा विचार करता तेथे ५२ लाख चौरस फूट जागा व्यापारी आस्थापनांसाठी आहे. त्यातील १५ टक्के जागा रिकामी पडून आहे. आर्थिक क्षेत्रातील मंदीचा हा परिणाम असून राजकीय क्षेत्रातील अनिश्चितताही त्यास कारणीभूत मानली जात आहे. या वातावरणामुळे देशी-परदेशी औद्योगिक-व्यापारी आस्थापनांनी आपापल्या विस्तार वा गुंतवणुकीच्या योजना रोखून धरल्या आहेत. देशातील राजकीय-आर्थिक चित्र स्पष्ट झाल्यानंतरच पुढील वाटचालीची दिशा निश्चित होणार असल्याचे मानले जात आहे.