व्यवसायासाठी घेतलेले कर्ज परत न केल्याने चिडलेल्या दोघांनी आपल्या सहकाऱ्याची हत्या केली. परंतु, आरोपींना अवघ्या २४ तासांत अटक करण्यात घाटकोपर पोलिसांना यश आले आहे.
घाटकोपर पश्चिमेच्या असल्फा व्हिलेजमध्ये डॉ. भानुशाली यांचा दवाखाना आहे. त्यांच्या दवाखान्याच्या वर त्यांची एक खोली आहे. ही खोली त्यांनी भाडय़ाने दिली होती. ५ ऑगस्ट रोजी या खोलीतून दरुगधी येऊ लागल्याने पोलिसांना बोलाविण्यात आले. खोलीचे दार उघडून आत प्रवेश केला असता आत एका ४० वर्षीय इसमाचा मृतदेह हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळला. त्याची ओळख पटली नव्हती. ही खोली गिरीश भानुशाली या व्यक्तीला देण्यात आली होती. परंतु तो काही दिवसांपासून फरार होता. घाटकोपर पोलिसांनी तपास केला असता हा मृतदेह विजय मुरजी याचा असल्याचे निष्पन्न झाले. त्याची हत्या कुणी आणि कशासाठी केली त्याचा उलगडा होत नव्हता. परंतु पोलिसांनी त्वरित तपासाची चक्रे फिरवली आणि राहुल भानुशाली तसेच त्याचा साथीदार गिरीश भानुशाली या दोघांना अटक केली.
मयत विजय मुरजी हा गुजरातमधील बडोद्याचा कपडय़ांचा व्यापारी आहे. त्याची आरोपींबरोबर ओळख होती. कपडय़ांच्या निर्यातीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी विजयने दोघांना तयार केले आणि त्यांच्याकडून १० लाख रुपये घेतले. या धंद्यात भरपूर नफा मिळेल असेही त्याने सांगितले. दरम्यान, दोन वर्ष उलटून गेले तरी विजय व्यवसाय सुरू करत नव्हता तसेच घेतलेले पैसे परत करत नव्हता. त्यामुळे त्यांच्यात वाद सुरू होता. यामुळे संतापलेल्या भानुशालींनी विजयचा काटा काढण्याचे ठरवले. ५ ऑगस्ट रोजी दोघांनी विजय मुरजीला मुंबईला बोलावले आणि असल्फा गावातील या भाडय़ाच्या घरात आणले. तेथे त्याचे हातपाय बांधून त्याला चामडी पट्टा आणि लोखंडी सळईने मारहाण केली आणि नंतर गळा दाबून हत्या केली. हत्या केल्यानंतर त्यांनी मध्यरात्रीच पळ काढला होता. यातील एक आरोपी गुन्हेगारी पाश्र्वभूमीचा असल्याचे घाटकोपर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट पाटील यांनी सांगितले.