निवडणुकीच्या काळात झोपडपट्टीतले मतदार पैसे अथवा भेटवस्तूंच्या आमिषाने सहज मॅनेज होतात. त्या एकगठ्ठा मतांच्या जिवावर नको ते उमेदवार लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतात, असा आपला एक मध्यमवर्गीय पांढरपेशीय निष्कर्ष असतो. निवडणूक यंत्रणा अगदी डोळ्यात तेल घालून आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचा प्रयत्न करीत असली तरी काही ठिकाणी असे प्रकार होतात, ते नाकारता येत नाही. पण सध्याच्या राजकीय अध:पतनाला केवळ तेवढे एकच कारण नाही. अगदी सत्शील आणि पांढरपेशी म्हणवणाऱ्या समाजातील काही घटकही कळत-नकळतपणे हल्ली राजकीय प्रवृत्तींचे अप्रत्यक्ष लाभार्थी ठरू लागले आहेत.
झोपडपट्टय़ांसारखे सोसायटय़ांमध्ये राहणारे एका दिवसात (खरे तर एका रात्रीत) पैसे देऊन मॅनेज करता येत नाहीत, हे पुढाऱ्यांना चांगलेच ठाऊक असते. त्यामुळे या पांढरपेशी समाजावर प्रभाव टाकण्यासाठी ते सातत्याने निरनिराळ्या क्लृप्त्या आणि युक्त्या लढवीत असतात. वर्षांतून एकदा आमदार श्री अथवा नगराध्यक्ष/महापौर श्री भरवून शहरातील तरुणांना धरून ठेवतात. वर्षांतून एकदा  जवळील एखाद्या धार्मिक अथवा पर्यटनस्थळाची सहल घडवून आणून ज्येष्ठ नागरिकांना खूश ठेवतात. महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’ छापाच्या स्पर्धा भरवून आकर्षक पारितोषिके देतात. वस्तीतल्या प्रार्थनास्थळांच्या जीर्णोद्धारासाठी सढळ हस्ते मदत करतात.
शहरातील काही स्वयंसेवी आणि सांस्कृतिक उपक्रम राबविणाऱ्या संस्थाही आर्थिक सहकार्याच्या हेतूने राजकीय पक्षांचे मांडलिकत्त्व स्वीकारतात. काही ठिकाणी तर राजकीय नेते मंडळीच सांस्कृतिक आणि सामाजिक  उपक्रमांसाठी स्वतंत्र संस्था स्थापून त्याद्वारे शहरातील गुणीजनांचा ताफा आपल्या पदरी बाळगतात. या संस्थांच्या माध्यमातून अधूनमधून मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करून ते मतदारांना खूश ठेवण्याचा प्रयत्न करतात. ठिकठिकाणची गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळे नियमित देणग्या देऊन आपल्या अंकित ठेवतात. अगदी धार्मिक अथवा अध्यात्मिक स्वरूपाचे कार्यक्रम आयोजित करणारी मंडळीही राजकारण्यांच्या भजनी लागलेली दिसतात.
लोकप्रतिनिधींच्या या तथाकथित कार्याचा क्लोरोफॉर्म इतका जबरदस्त असतो, की एरवी निरक्षर विवेक बाळगणाऱ्या मंडळींचीही सदसद्विवेकबुद्धी काम करेनाशी होती. या असल्या उपक्रमांसाठी लागणारा पैसा लोकप्रतिनिधी आणतात कुठून असा प्रश्न त्यांना पडत नाही. अशी सत्शील माणसे मग एकतर डोळ्यांवर पट्टी ओढून शहरातील वाढत्या असुविधांकडे दुर्लक्ष करतात अथवा खाजगी गप्पांमध्ये वांझोटय़ा चर्चा करतात. कारण अतिशय किरकोळ स्वरूपाचे लाभ पदरात पाडून लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याची ताकद ते गमावून बसलेले असतात.