मतदानासाठी सकाळपासून आपापल्या भागातील मतदान कें द्रांवर कलाकारांनी हजेरी लावली होती. खासदार अभिनेत्री जया बच्चन यांच्यापासून ते अगदी कुणाल खेमू, मंदिरा बेदीपर्यंत अनेक कलाकारांनी मतदान केले. मतदान केल्यानंतर सेल्फी काढून सोशल मीडियावर टाकायचे आणि चाहत्यांना मतदानासाठी आवाहन करण्याचा सपाटाच कलाकारांनी सुरू  ठेवला होता.
हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांचा अड्डा असलेल्या जुहू परिसरापासूनच मतदानाचा शुभारंभ झाला. जया बच्चन यांनी अभिषेक बच्चन याच्यासह मतदान केले. त्यानंतर गीतकार जावेद अख्तर, अभिनेत्री भाग्यश्री, उद्योजक अनिल अंबानी, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर, खासदार mv03रेखा आदींनी सकाळीच मतदान केले. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदार यादीत नाव नसल्याने मतदानाची संधी गमावलेल्या अभिनेता अतुल कुलकर्णीनेही सकाळी मतदान केलेच. शिवाय, आपल्या आगामी ‘हॅप्पी जर्नी’ चित्रपटातील सहकलाकार अभिनेत्री प्रिया बापट हिचेही छायाचित्र टाकून मतदानाच्या या ‘हॅप्पी जर्नी’मध्ये सहभागी होण्याचे आवाहनही चाहत्यांना केले.
मतदान करा.. पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ त्यासाठी लागत नाही.. मतदान करा आणि महाराष्ट्राला स्थिर सरकार द्या.. स्वत: गाडी चालवत मतदान केंद्रापर्यंत जा, मी तर माझ्या वाहनचालकालाही मतदानासाठी पाठवले आहे. अशा आशयाचे  संदेश अभिनेता तुषार कपूर, दिग्दर्शक पुनीत मल्होत्रा, अनुभव सिन्हा, नेहा धुपिया, सुनील ग्रोव्हर सारख्या बॉलिवूडच्या मांदियाळीतील कलाकारांनी पाठवले आहेत. तर अभिनेत्री मंदिरा बेदी, पूजा बेदी, आर. माधवन, रितेश देशमुख, विजय पाटकर, पुष्कर श्रोत्री यांनी आपले सेल्फी सोशल मीडियावर टाकून मतदारांना आवाहन केले आहे. ट्विटरच्या माध्यमातून मतदारांना आवाहन करण्याचा मोह खुद्द अमिताभ बच्चन यांनाही आवरलेला नाही. ‘मतदान करा, जबाबदार नागरिक बना.’, असा सल्ला अमिताभ यांनी दिला आहे.
बुधवारपासून ‘मामि’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. सिनेप्रेमींनाही मतदान करता यावे यासाठी महोत्सवाचे ठिकाण असलेल्या वर्सोवा सिनेमॅक्स येथील सिनेमागृहात दुपारी अडीचनंतर महोत्सवातील चित्रपट दाखवण्यात येतील, असे जाहीर करण्यात आले होते. मात्र, महोत्सवात चित्रपट बघण्यासाठी उत्सुक असलेले अनेकजण सकाळी सात वाजताच मतदान करून वर्सोव्यात पोहोचले होते. आयोजकांनी या सिनेप्रेमींच्या उत्साहाला दाद दिली खरी परंतु, ठरल्याप्रमाणे चित्रपट अडीचलाच दाखवण्यात येईल, असे सांगितले. महोत्सवाला उपस्थित असलेल्या बॉलिवूड कलाकारांनाही मतदान केले का?, या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागले.
दुपारी अकरानंतर अनेक सेलिब्रिटींनी मोठय़ा प्रमाणावर मतदान केले. यात अभिनेता अनुपम खेर, त्यांची पत्नी किरण खेर आणि मुलगा सिकंदर खेर, हेमामालिनी आणि ईशा, दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा, दिग्दर्शक किरण राव, सोनाली बेंद्रे आणि गोल्डी बेहल अशा सेलिब्रिटी जोडप्यांनीही मतदान केले.