मान्सूनच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची मशागतीच्या कामाला सुरुवात झाली आहे. या जिल्ह्य़ातील ४ लाख ५८ हजार ४०३ हेक्टर जमीन पिकाखाली येणार असून, त्यासाठी जिल्ह्य़ाला ९३ हजार २९ क्विंटल बियाण्यांची गरज पडणार आहे. यंदा सोयाबीनचा पेरा वाढणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. १ लाख ४४ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड केली जाणार आहे.
ग्रामीण भागात शेतकरी मोठय़ा जोमाने यंदाही खरीप हंगामाच्या कामाला लागले आहेत. शेतातील कचऱ्याची साफसफाई, अनावश्यक वाढलेल्या गवती झाडांची कापणी आणि पाळय़ांना आग लावून शेतजमीन व्यवस्थित केली जात आहे. उन्हाळ्यात बैलबंडीतून शेणखत टाकण्याचे काम केले जाते.   खरिपाच्या हंगामासाठी कृषीक्षेत्रही सज्ज झाले आहे. रासायनिक खते व बियाण्यांचा पुरवठा होत आहे. यंदा कापसाला भाव न मिळाल्याने सोयाबीनची मोठय़ा प्रमाणात लागवड करण्यात येणार आहे. गेल्या हंगामात १ लाख ३० हजार ६८० हेक्टरवर शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली होती. यावर्षी या पिकाचे क्षेत्र वाढणार आहे. १ लाख ४४ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड केली जाणार आहे. गेल्या वर्षी १ लाख ७१ हजार २१८ हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली होती. यंदा धानाच्या पेऱ्यातही वाढ, तर कपाशीच्या पेऱ्यात घट होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. गेल्या वर्षी १ लाख १३ हजार ७५० हेक्टरवर बीटी कपाशीची लागवड करण्यात आली होती. यंदा त्यात घट होऊन १ लाख ३ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड केली जाणार आहे. यासाठी १८ हजार ५१२ क्विंटल धान बियाणे, ७० हजार २०० क्विंटल बीटी कपाशी बियाण्यांची आवश्यकता आहे. अन्य पिकांमध्ये संकरित ज्वारी ४०० क्विंटल, तूर १ हजार ४४० क्विंटल, मूल २७ क्विंटल, उडीद १६ क्विंटल बियाण्यांची यंदा गरज आहे. ७ जूनपासून मृग नक्षत्राला प्रारंभ झाला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांसह कृषी विभागही कामाला लागला आहे.
खरिपाचे संपूर्ण नियोजन झाले असून, खते व बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. यंदा खत व बियाण्यांचा तुटवडा भासणार नाही, असा दावा कृषी विभागाने केला आहे. मागील वर्षी कापसाचे चांगले उत्पादन झाले. मात्र, भाव न मिळाल्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी आपले नियोजन बदलले आहे. बाजारपेठेतील सोयाबीनचा भाव व त्याची मागणी लक्षात घेता, शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पेरा वाढविण्याची तयारी चालविली आहे. गतवर्षी मान्सून वेळेवर आला. पावसाची सुरुवातही दमदार झाली. त्यामुळे उत्पादनही चांगले येणार, अशी आशा शेतकरी बाळगून होते. मात्र, अतिवृष्टीने शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला. अनेक तालुक्यातील पिके उद्ध्वस्त झाली. यातून बळीराजा कसाबसा सावरला असतानाच अकाली पावसाने हजेरी लावली. त्यामुळे खरिपासोबत रब्बी पिकेही बुडाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे ओल्या दुष्काळाचा फटका बसला. यंदाचा उन्हाळा चांगलाच तापला. विहिरी कोरडय़ा पडल्या, तलाव व नाले-नद्याही आटल्या. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्याही निर्माण झाली आहे. उन्हामुळे शेतजमिनीला भेगा पडू लागल्या आहेत. या मातीला आता पावसाची प्रतीक्षा आहे.
ग्रामीण भागातील शेतकरी चांगल्या प्रतीच्या धान्याचे बियाणे साठवून ठेवतात. देवाण-घेवाणीच्या माध्यमातून बियाण्यांचा पुरवठा शेतकऱ्यांना होत आहे. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्या लक्षात घेऊन काही ठिकाणी घरांची व्यवस्था, बैलांचे गोठे तयार करण्यात येत आहेत. बैलांचा चाराही योग्य ठिकाणी साठवलेला आहे. शेतीतून मिळालेल्या मिळकतीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह व अन्य महत्त्वाची कामे आटोपल्यानंतर जे पैसे पदरी उरले त्या भरवशावर शेतकरी या हंगामासाठी सरसावले आहेत, तर कित्येक शेतकरी पैशाची जुळवाजुळव करण्यासाठी कर्जासाठी बँकेचे उंबरठे झिजवत आहेत. काही सावकारांकडे चकरा मारताना दिसत आहेत. बहुतांश शेतकऱ्यांची शेतातील कामे आटोपली असून आता प्रतीक्षा केवळ चांगल्या पावसाची आहे.