बोचऱ्या थंडीच्या वातावरणात गेल्या आठ दिवसांपासून येथे सुरू असलेल्या कीर्तन महोत्सवाचा समारोप पंडित ह्रदयनाथ मंगेशकर यांच्या सुश्राव्य गायनाने होऊन यवतमाळकर रसिकांच्या आनंदाला जणू उधाण आले होते.
कीर्तन महोत्सव समितीच्यावतीने आयोजित या कार्यक्रमात त्यांनी ‘ज्या व्यासपीठावर महान कीर्तनकारांनी सेवा दिली त्याच व्यासपीठावर आपल्याला हजेरी लावता आली, याचा अतिशय आनंद होत आहे. कीर्तन आणि संगीत एकमेकांना पूरक आहेत. आयुष्याचा खरा आनंद संगीत आणि कीर्तन यातच असल्याची आपली भावना आहे’, असे उद्गार काढले.
अरे अरे ज्ञाना झालासी पावन, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती, देव देश अन् धर्मापायी प्राण घेतले हाती, ही गीते सादर करतानाच शूर आम्ही सरदारचे विडंबन करीत पंडित मंगेशकर यांनी ‘चोर आम्ही सरकार आम्हाला काय कुणाची भीती, गोरगरीब आणि दुबळय़ांचे प्राण घेतले हाती, असे गाऊन आजच्या समाजरचनेवर बोट ठेवले. रुणझुण रुणझुण रे भ्रमरा, मोगरा फुलला, इवलेसे रोप लावीयले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावेरी इत्यादी गीते सादर केली. मेंदीच्या पानावर मन अजून झुलते गं, केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली, मिटले चुकुन डोळे हरवून रात्र गेली, या सुरेश भटांच्या गझल सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
‘सागरा प्राण तळमळला’ हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे गीत पंडित ह्रदयनाथ मंगेशकर, त्यांची कन्या राधा मंगेशकर आणि नागपूरचे अभय कुळकर्णी, या तिघांनी संयुक्तपणे सादर केले. उल्लेखनीय म्हणजे, पंडित ह्रदयनाथ मंगेशकर यांच्यासमोर यवतमाळचे संगीत क्षेत्रातील नामवंत कलावंत प्रा. राहुल एकबोटे यांनी ‘माझे माहेर पंढरी’ हे गाणे सादर करून रसिक श्रोत्यांच्या टाळ्या मिळविल्या.
 पंडित ह्रदयनाथ मंगेशकर यांनीसुद्धा प्रा. राहुल एकबोटे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आणि भविष्यात मोठा गायक होशील, असा आशीर्वाद दिला. समारोपाच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संगीततज्ज्ञ प्रभाकरराव देशपांडे होते. सुरेश कैपिल्यवारे डॉ. विजय पोटे, अरिवद तायडे, अरुण भिसे, डॉ. सुशील बत्तलवार या पदाधिकाऱ्यांनी पंडित ह्रदयनाथ त्यांची कन्या राधा मंगेशकर व प्रा. राहुल एकबोटे यांचा सत्कार केला. राधा मंगेशकर यांनी गायिलेल्या पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप झाला.