राजा हरिश्चंद्र या पहिला चित्रपटाची निर्मिती होऊन ९९ वर्ष पूर्ण झाली आहेत. चित्रपट निर्मितीच्या शताब्दी वर्षांला प्रारंभ झाला आहे. या घटनेचे औचित्य साधून राज्य शासनाने २०१३-१४ हे वर्ष भारतीय चित्रपट सृष्टीचे शतक महोत्सवी वर्ष साजरे करण्याचे शासनाने ठरविले आहे. त्याचाच एक भाग म्हणून नागपुरात २२ ते २८ फेब्रुवारी दरम्यान पंचशील चित्रपटगृहात चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला असून या महोत्सवाचे उद्घाटन अभिनेते जितेंद्र यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन २२ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता होणार असून यावेळी पालकमंत्री शिवाजीराव मोघे, सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख, जलसंधारण मंत्री डॉ. नितीन राऊत, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री फौजिया खान, अर्थराज्यमंत्री राजेंद्र मुळक, महापौर अनिल सोले उपस्थित राहणार आहेत. राज्यात नाशिक, औरंगाबाद, अमरावती, पुणे, रत्नागिरी, कोल्हापूर, व मुंबई या आठ शहरात हा महोत्सव आयोजित केला जात असून त्याची सुरुवात ८ फेब्रुवारीपासून करण्यात आली आहे.
सात दिवस होणाऱ्या या महोत्सवात १९३० च्या दशकातील तुकाराम, कुंकु, ब्रम्हचारी, नेताजी पालकर, १९४० च्या दशकातील चिमुकला संसार, रामशास्त्री, जयमल्हार, राम जोशी, मीठ भाकर, लाखाची गोष्ट, पेडगावचे शहाणे, गुळाचा गणपती, श्यामची आई, इन मीन साडेतीन, सांगत्ये ऐका, मल्हारी मरतड, मुंबईचा जावाई, सोंगाडय़ा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आक्रित, बनगरवाडी, वास्तूपुरूष, जोगवा, बाबू बँड बाजा, गाभरीचा पाऊस, पाऊस, खेळ मांडला, हे चित्रपट सकाळी १० वाजतापासून दाखविण्यात येणार आहेत. या शिवाय मदर इंडिया, दो बिघा जमीन, आवारा, निशांत, किस्मत, अर्धसत्य, जाने भी दो यार, मिर्च मसाला, दो ऑखे बारा हाथ, कागज के फूल, कथा, अचानक, देवदास आदी हिंदी चित्रपट दाखविण्यात येतील.