कराडकर रसिकांसाठी घरचे व्यासपीठ असलेल्या आणि कराडकरांचा उत्सव म्हणून सलग १३ वष्रे मोठय़ा दिमाखात साजरा होणाऱ्या यंदाच्या प्रीतिसंगम संगीत महोत्सवाचा शुभारंभ ख्यातनाम बासरीवादक पंडित रोणू मुजूमदार यांच्या बासरी वादनाने झाला. पुढे सौ. सानिया पाटणकर, तर, दुसऱ्या दिवशी कराडचीच सुकन्या कुमारी प्राची कुलकर्णी व किराणा घराण्याचे लोकप्रिय गायक पंडित जयतीर्थ मेवूंडी यांनी स्वरसाज चढवताना, ही संगीत मैफल जणू ब्रह्मानंदाची अनुभुती देणारी ठरवली. एकाहून एक सरस कलाकारांच्या नामी सादरीकरणास कराडकर संगीत प्रेमींनी टाळय़ांच्या कडकडाटाने भरभरून प्रतिसाद देताना, हा महोत्सव रसिकांच्या मनात अविस्मरणीय गुंजन घालणारा ठरल्याचे दिसून आले.
पंडित रोणू मुजूमदारांची बासरीची धुन, अन् सानिया पाटणकर यांच्या गानमाधुर्याने पहिल्याच दिवशी रसिकांची मने जिंकली. तर, महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात यंदाच्या महोत्सवाचे वैशिष्टय़ घडून गेले. गत १३ वर्षांतील या महोत्सवाचे फलित म्हणजे कराडचीच होतकरू कलाकार व पंडित विजय कोपरकर यांची शिष्या कुमारी प्राची कुलकर्णी हिने मंचावर सादर केलेले आणि कराडकरांसाठी कुतूहलाचे ठरलेले शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन अविस्मरणीय ठरले. कुमारी प्राचीने राग ‘वाचस्पती’ मध्ये ‘राखो मेरी लाज’ व ‘गगनदीप जले’ या बंदिशी मांडल्या. तिने ‘साजन मोरे घर आये’ या बंदिशीबरोबरच ‘कोण तुझ सम सांग गुरुराया’ हे नाटय़गीत गायले. पहिल्या सत्राच्या सांगतेला ‘अवघाची संसार सुखाचा करीन या अभंगाने प्राची हिच्या गानमाधुर्याची उंची अधोरेखित झाली. मैफलीची रंगत टिपेला पोहोचली असताना, महोत्सवाचा समारोप किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक पंडित जयतीर्थ मेवूंडी यांच्या बहारदार गायनाने पार पडला. त्यांनी राग पूरीया कल्याणमध्ये ‘आज सो बन’ हा ख्याल मांडला. पुढे कलाश्री रागामध्ये ‘धन, धन भाग सुहाग’ ही बंदिश व तद्नंतर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी अजरामर केलेली अभूतपूर्व अभंगवाणी जयतीर्थ मेवूंडी यांनी सुरेख सादर केली अन् अवघे सभागृह भक्तिरसात न्हाऊन निघाले. ‘विसावा विठ्ठल’, ‘लय नाही मागणे’, ‘राजस सुकुमार’, ‘बाजे मुरलिया बाजे’, ‘भाग्यदा लक्ष्मी’ असे एकसे एक सुरेल अभंग सादर झाले. मैफलीचा समारोप ‘जो भजे हरी को सदा, ‘अगा वैकुंठीच्या राया, पावलो पंढरी’या भरवीतील भजनाने पार पडला. तिन्ही सप्तकात फिरणारा सुरेल स्वर, तानांची अफलातून रियाज, भावपूर्ण गायिकीमुळे रसिकांना खराखुरा आनंद मिळाला. महोत्सवात अविनाश पाटील (तबला), मनोज भांडवलकर (पखवाज), पंडित रवींद्र काटोरी, अनंत जोशी व राजेंद्र कुलकर्णी यांनी हार्मोनियमची बहारदार साथसंगत केली. सरतेशेवटी प्रास्ताविकात महोत्सवाचे संयोजक व कराड जिमखान्याचे अध्यक्ष सुधीर एकांडे यांनी पहिल्या प्रीतिसंगम संगीत महोत्सवात कलाकारांच्या सत्काराचे बुके आणून देणारी कुमारी प्राची यंदाच्या महोत्सवात प्रमुख कलावंत म्हणून नावाजल्याचे तसेच, महोत्सवाचे हे खरे यश असून, आम्हाला प्राचीच्या कर्तृत्वाचा अभिमान असल्याचे समाधान व्यक्त केले.