तीनचार दिवसांपासून महाबळेश्वरमध्ये थंडीचा जोर वाढला असून काल (रविवार) रात्री व आज सकाळी भल्या पहाटे येथील वेण्णा लेक परिसरात थंडीचा पारा भलताच खाली उरला होता. कडाक्याच्या थंडीमुळे वेण्णा लेक परिसरात दवबिंदू गोठून हिमकण झाल्याने अनेक ठिकाणी हिमकणांच्या शाली पांघरल्यासारखे दिसत होते. हिमकणांमुळे वेण्णा लेक बोटक्लबची जेटी, वेण्णा लेक ते लिंगमाळा या सुमारे १ कि.मी. परिसरात उभ्या असलेल्या गाडय़ांचे टप, लिंगमाळ्यातील कोबी, स्ट्रॉबेरीचे मळे तसेच ‘स्मृतिवन’ हा न.पा.केचा वृक्षारोपणाचा प्रकल्प परिसर हिमकणांनी माखला होता. स्मृतिवनात तर हिमकणांचा पांढराशुभ्र गालिचा पांघरल्यासारखे मनोहारी दृश्य दिसत होते. तर येथील पानांच्या कडा हिमकणांची रांगोळी काढल्यासारखी अप्रतिम दिसत होत्या. वेण्णा लेक परिसरातील गहू गेरवा संशोधन केंद्रातील गव्हाच्या लोंब्यांवर संरक्षणार्थ टाकलेल्या बारदानांवरही हिमकण पाहावयास मिळाले. दरम्यान आजच्या हिमकणांची मौज व मजा महाबळेश्वरचे नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, अतुल सलागरेसह अनेक स्थानिक व पर्यटकांनी मनमुरादपणे लुटली. सकाळी या परिसरातील थंडीचा जोर एवढा होता, की सकाळी ८ वाजता उन्हाची किरणे आली तरी हिमकण पाहावयास मिळत होते. या हंगामातील दुसऱ्यांदा हिमकण झाल्याचे दिसून आले.
गेले तीनचार दिवसांपासून सर्वत्र थंडीचा कडका होता. देशाच्या उत्तर भागात तर थंडीने थैमान घातले होते. हिमवृष्टी ठिकठिकाणी पाहावयास मिळत होती. महाराष्ट्राचे नंदनवन महाबळेश्वरही दोनतीन दिवसांपासून गारठले होते. स्थानिकांसह पर्यटक वुलनचे कपडे, टोप्या, स्वेटर्स, जर्कीन, शाली घालून फिरताना दिसत होते. तर वेण्णा लेक परिसर यापेक्षाही जास्त गारठला होता. सायंकाळ झाली की या परिसरातील रस्त्यालगतचे स्टॉलधारक शेकोटी करून शेकत बसत होते. दरम्यान काल रात्रीपासून तर वेण्णा लेक ते लिंगमाळा परिसरातील थंडीचा जोर आणखीनच वाढला. या परिसरात दुचाकीवरून फिरताना या बोचऱ्या थंडीचा अनुभव विशेष येत होता. आज भल्या पहाटे तर या भागात ठिकठिकाणी दवबिंदू गोठून हिमकण झाल्याचे पाहावयास मिळाले.