राष्ट्रवादी काँग्रेसने विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया सुरू केली आहे. सातजणांच्या मुलाखती घेतल्यानंतर या पदावर आपला मुलगा जयदत्त याची वर्णी लावण्यासाठी आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. तर सभापती संदीप क्षीरसागर समर्थक शाहेद पटेल यांच्यासाठी पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर-धस यांच्यात पक्षांतर्गत कुरघोडीचा डाव रंगला आहे.
बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व कार्यकर्त्यांच्या गर्दीने ‘हाऊसफुल्ल’ झाला आहे. वाढलेल्या गर्दीत आपले वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी जोरदार स्पर्धा सुरू आहे. यातून छोटय़ा-मोठय़ा पदासाठीही दिग्गजांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
राष्ट्रवादीच्या विद्यार्थी आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदाची निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रदेशाध्यक्ष नीलेश राऊत यांच्याकडे शिफारसपत्र पाठविण्यात आले. त्यातून इच्छुक सातजणांच्या मुलाखती झाल्या. त्यानंतर आता या पदावर वर्णी लावण्यासाठी दोन दिग्गज नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.