फेब्रुवारी महिन्यात झालेली गारपीट व अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्तांना मदत देण्यासाठी केल्या गेलेल्या पंचनाम्यांपैकी बऱ्याच ठिकाणचे पंचनामे हे सदोष झाल्याने अनेकांना शासनाच्या नुकसानभरपाईपासून वंचित राहावे लागल्याची ओरड असून, त्या विरोधात तक्रार करण्यासाठी शेतकऱ्यांचे लोंढे येथील तहसील व प्रांत कार्यालयात खेटे मारत आहेत. कुठे घरात बसून हे पंचनामे उरकविण्यात आले, कुठे तोंडदेखलेपणा झाला, कुठे आर्थिक देव-घेव करून नुकसानभरपाईच्या यादीत नावे घुसडवली गेली, तर नुकसानीचे रीतसर पंचनामे होऊनही बऱ्याच शेतकऱ्यांच्या पदरात मदतीचा छदामही पडला नाही, अशा स्वरूपाच्या या तक्रारी असून या प्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याबरोबर फेरपंचनामे करण्याची मागणी करण्यात येत आहे.
गारपीटग्रस्तांना मदत देता यावी म्हणून प्रशासनाने फेब्रुवारी महिन्यात युद्धपातळीवर नुकसानीचे पंचनामे केले होते. त्यासाठी गावचा तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांच्या संयुक्त उपस्थितीत हे पंचनामे करण्याचे शासनाचे निर्देश होते. त्यानुसार या तिघांवर तीन ते पाच गावांचे संयुक्त पंचनामे करण्याचे काम सोपवण्यात आले. मात्र तातडीच्या बंधनामुळे वरील तिघांनी संयुक्त पंचनामे न करता गावांचे वाटप करून प्रत्येकाने स्वतंत्रपणे पंचनाम्याचे काम पार पाडल्याचे बोलले जाते. हे करताना काही जणांनी काम योग्यरीत्या बजावले तरी काहींनी मात्र त्यात हयगय व बेजबाबदारपणा केल्याची तक्रार आहे. पंचनामे योग्य प्रकारे न झाल्याने नुकसान होऊनही अनेकांना भरपाई मिळू न शकल्यामुळे त्यांच्यात संतप्त भावना निर्माण झाली आहे. तालुक्यातील दाभाडी, बेळगाव, कजवाडे, खडकी, दसाणे, वाके अशा २० हून अधिक गावांमधील नुकसानग्रस्तांनी आतापर्यंत या संदर्भात तक्रारी केल्या आहेत.
खडकी व दसाणे येथे झालेल्या गारपिटीमुळे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले असताना फारच थोडय़ा जणांना तेथे मदत मिळाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. पंचनाम्यासाठी नियुक्त कर्मचाऱ्याने घरात बसून हे काम पार पाडले. अनेकांनी शेतास भेट देण्याची विनवणी करूनही या कर्मचाऱ्याने ती धुडकावून लावली. इतकेच नव्हे तर पुन्हा गारपीट झाल्याचे लक्षात आणून दिल्यावरही दुर्लक्ष करण्यात आल्याची नुकसानग्रस्तांची तक्रार आहे.
कजवाडे येथे ज्यांच्या शेतात कांदा नाही, त्यांना कांदा नुकसानीची घसघशीत मदत देण्याची करामत केली गेली, तर ज्यांचे खरोखर नुकसान झाले आणि ज्यांच्या शेताचे प्रत्यक्षात पंचनामे केले गेले, त्यांना मात्र मदतीपासून वंचित ठेवण्यात आल्याची तक्रार आहे. तेथील नियुक्त कर्मचाऱ्याने नुकसानग्रस्तांची यादी करताना तोंडदेखलेपणा केल्याचा आणि हस्तकाकरवी आर्थिक देवघेव केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. वाके येथे जिराईत जमिनी असणाऱ्यांवर डाळिंब नुकसानीपोटी भरपाई देण्याची कृपादृष्टी केली गेली, तर डाळिंब बागा नष्ट होऊन ज्यांच्यावर मोठा आर्थिक आघात आला त्यांना भरपाई देण्यात कुचराई करण्यात आल्याची तक्रार आहे.