नेत्रदान आणि देहदानाविषयी व्यापक जनजागृतीची गरज असून याबाबतीत पुरोगामी म्हणविणारा महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे येथील तुलसी आय हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी संचालक डी. के. झरेकर यांनी सांगितले. येथील यशवंतराव महाराज पटांगणावर आयोजित वसंत व्याख्यानमालेत झरेकरांनी ‘नेत्रदान आणि देहदान’ या विषयावर माहिती दिली.
डॉ. राजन कुलकर्णी यावेळी उपस्थित होते. जगात साडेचार कोटी लोक अंध असून त्यातील दीड कोटी लोक भारतात असल्याची माहिती झरेकर यांनी दिली. भारतात दरवर्षी दीड कोटी बुबूळांची गरज असते. पण वर्षांत केवळ ३५ हजार बुबूळ उपलब्ध होतात. त्यामुळे नेत्रदान आणि देहदानाविषयी व्यापक जनजागृती होणे अपेक्षित आहे. सजीवाचे शरीर अचेतन झाले की निसर्गच त्याची विल्हेवाट लावण्यास सुरूवात करतो. पेशी विघटनास सुरूवात होते. भारतीयांवर धर्मसंस्काराचा पगडा अधिक आहे. परंतु धर्मसंस्कार केवळ मानसिक समाधान देऊ शकतात असेही ते म्हणाले.
भारतात जीवनशैलीमुळे मधुमेहाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. मधुमेहाचा डोळ्यांवर परिणाम होतो. माणसाला अंधत्व येण्याची अनेक कारणे आहेत. तसेच वेगवेगळ्या कारणांनी बुबूळावर पडदा येण्याचे प्रमाण वाढले आहे. संसर्ग झाल्यावर कायमस्वरूपी अंधत्व येऊ शकते भारतात मोतीबिंदूचे प्रमाण टक्केवारीत ४७.८, काचबिंदूचे प्रमाण १२.३ आणि बुबुळाच्या आजाराचे प्रमाम ५.१ आहे. मोतीबिंदू, बुबुळाची अपारदर्शकता, दृष्टिदोष यावर उपचार होऊ शकतो. डोळ्यांच्या कर्करोगाचे प्रमाण आदिवासी भागात जास्त आहे.
अंधत्व हे व्यक्तीपुरता मर्यादित नसते तर समाज व मानवजातीला तो शाप आहे. अंधत्वामुळे कुटुंबावर ताण पडतो. जगात श्रीलंकेत मोठय़ा प्रमाणावर नेत्रसंकलन होत असल्याचे झरेकर यांनी सांगितले. डॉ. कुलकर्णी यांनी देहदानाविषयी माहिती दिली. शंकर बर्वे यांनी आभार मानले.