मोगल व इंग्रजांनी देशाला जेवढे लुटले नाही, तेवढी लूट मागच्या ६६ वर्षांत करण्यात आली. अनर्थ शास्त्राची ही देण आहे. या वर्षांत नवे महाभारत होऊन धर्मराज्याची प्रतिष्ठापना केली जाईल. त्यासाठी नरेंद्र मोदींसारख्या फकिराला पंतप्रधान करा, असे आवाहन योगगुरू रामदेवबाबा यांनी केले.
स्व. पंडित मदनगोपाल व्यास यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित केलेल्या महाभारत कथा ज्ञानयज्ञ सोहळय़ाच्या सांगतेप्रसंगी रामदेवबाबा बोलत होते. या वेळी भारतमाता मंदिराचे संस्थापक माजी शंकराचार्य, सत्यमित्रानंद महाराज, आचार्य गोिवदगिरी महाराज, मुकुंदकाका जाटदेवळेकर, दादा महाराज आपेगावकर, महंत रामगिरी महाराज उपस्थित होते.
रामदेवबाबा म्हणाले, जीवनातील कर्म प्रत्येकाने केले पाहिजे. सफलता ही पुरुषार्थातून येते. त्याकरिता कष्ट करावे लागतात. कामचोर व आळशी लोकांनी खूप नुकसान केले. मोठे लोक कष्ट करीत नाहीत, दुस-याच्या मालावर जगतात. अशा मेहनत न करणा-यांनी देशातील जल, जंगल व जमीन लुटली. श्रीमंत देशातील नागरिकांना गरीब बनविले. भारतमातेच्या भूगोलाची मोडतोड केली. या दरिद्री लोकांनी १ हजार लाख कोटीचे काळे धन देशाबाहेर नेले. सोने व खनिजाचा राजकारणासाठी वापर केला जातो. वेदशाळेसाठी दान मागावे लागते, पण काळा पैसा परत आला तर वेदशाळा महालात जातील. मोदी यांचे लग्न झालेले नाही, ते फकीर आहेत. त्यांना पंतप्रधान केले तर हा पैसा देशात येईल. व्यवस्था बदलण्याचे काम संसदेच्या माध्यमातून करावे लागेल. त्यासाठी ३०० खासदार निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले.
२३ मार्चपासून देशभर योगमहोत्सव आयोजित केला जाणार आहे. त्यात देशातील १० कोटी लोक सहभागी होणार आहेत. ३० मार्च रोजी जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयांवर हा महोत्सव होईल. या महोत्सवात संत मुरारीबापू, रमेश ओझा, प्रवीण पंडय़ा यांच्यासह अनेक संत सहभागी होणार आहेत. महर्षी दयानंद, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद यांच्या स्वप्नातील भारत उभारण्याचे काम करण्याचा त्यामागे उद्देश आहे, असे रामदेवबाबा म्हणाले.
माजी शंकराचार्य स्वामी सत्यमित्रानंद महाराज म्हणाले, सरकार कधीही सरकते. धर्म द्वेष शिकवत नाही, योग ही आमची संस्कृती आहे, संस्कृती मानणारा पंतप्रधान असला पाहिजे. भारतमातेची सेवा केली पाहिजे. रामदेव बाबा हे विदेशी संस्कृतीच्या विरुद्ध आहेत. रामराज्य आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. या वेळी जाटदेवळेकर व गोिवदगिरी यांचीही भाषणे झाली. महेश व्यास यांनी प्रास्ताविक  केले. ज्ञानेश्वर गवले यांनी सूत्रसंचालन केले. गोिवदगिरी महाराज यांनी विविध संस्थांना ६१ लाख रुपयांची देणगी दिली.