खाजगी शाळेत मूलभूत सुविधांचा अभाव असतानाही त्याची पाठराखण करून जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पाडण्याचे कारस्थान जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या प्रशासनाकडून करण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य शिवकुमार यादव आणि उपासराव भुते यांनी केला आहे. संगणक व वॉटर फिल्टर जिल्हा परिषदेच्या अनेक शाळात वर्षभरापासून बंद असल्याची ओरड करूनही अजूनपर्यंत त्याची दखल घेण्यात न आल्याने प्रशासनाविरुद्ध सदस्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे.
जिल्ह्य़ात मान्यता प्राप्त खासगी शाळांत शासनाच्या नियमांना डावलण्यात येत असल्याची तसेच मूलभूत सुविधांच्या अभावासह अनेक शाळांत क्षमतेपेक्षा जास्त मुलांना वर्गात बसविले जात असल्याची तक्रार शिक्षण विभागाकडे करण्यात आली, असे उपासराव भुते यांनी सांगितले. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारण्याच्या सूचना करूनसुद्धा प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात येत नसून उलट खासगी शाळांना प्रोत्साहित केले जात आहे. जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले शिक्षक सतत गैरहजर राहतात त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून संगणक नादुरुस्त व धूळखात पडले आणि वॉटर फिल्टर लावले ते तेव्हापासून बंद अवस्थेत असल्याने अशुद्ध पाण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. यासंबंधी तक्रार करूनही गटशिक्षणाधिकारी आणि शिक्षणाधिकाऱ्यांकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही.
शिवगिरी प्राथमिक शाळा टेकाडी कोळसा खदान व सोनिया प्राथमिक शाळा मांढळ येथील अवस्थ्ंबाबत शिक्षण विभागाकडे शिवकुमार यादव यांनी तक्रार केली. प्रशासनाकडून चौकशी करण्यात आली. मात्र, शिक्षणाधिकारी नेताम यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याचे कराण समोर करून त्या शाळांवर कारवाई करण्यास असमर्थता दाखविली. केंद्र शासनाच्यावतीने फिरते संगणक प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा लाभ व्हावा यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे ही योजना राबविण्याचा  प्रस्ताव शिक्षणाधिकाऱ्यांकडे लावला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन प्रस्ताव धुडकावून लावला. पत्रकार परिषदेला मनोज तितरमारे, कुहीचे पंचायत समितीचे सदस्य संदीप धानोरकर, सरपंच शाबीर सिद्दीकी व श्याम बर्वे उपस्थित होते.