लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसमध्ये इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) प्रदेश अध्यक्षपदावरून नाराजीचे वारे फिरू लागले असून विद्यमान प्रदेशाध्यक्षांची कामगिरी समाधानकारक नसल्याने पक्षातील दिशाहीन झालेल्या ओबीसी समाजास न्याय देण्याची मागणी प्रदेश काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे सरचिटणीस केशव विसपुते यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
महाराष्ट्रातील ओबीसी समाजाने संघटीत होण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील प्रमोद मोरे यांची १५ महिन्यांपूर्वी काँग्रेसच्या ओबीसी विभाग प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. नियुक्ती झाल्यापासून मोरे यांनी ओबीसीना न्याय देण्यासाठी कोणतेही काम करण्यात आलेले नसल्याची तक्रार विसपुते यांनी केली आहे. मोरे यांनी मेळावेही घेतलेले नाहीत. राज्यातील ओबीसी समाजाच्या कार्यकार्त्यांना कार्यकारिणीत सामावून त्यांना प्रवाहात आणण्याऐवजी त्यांनी मर्जीतील कार्यकर्त्यांना स्थान दिल्याचा आरोपही करण्यात आला असून प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून त्यांनी जिल्ह्यात कोणतीही बैठक अथवा विभाग मेळावा घेतलेला नाही अशी तक्रारही निवेदनात करण्यात आली आहे.