सलग ३ दिवस संततधार स्वरूपात बरसलेल्या पावसाने गुरुवारचा दिवस विश्रांती घेऊन शुक्रवारी पुन्हा संततधार सुरू केल्याने शेतीत आंतरमशागतीसाठी उघडीप मिळण्याची प्रतीक्षा शेतकरी करीत आहेत. दरम्यान, जिल्ह्याच्या एकूण वार्षकि सरासरीच्या निम्मी सरासरी या पावसाने केव्हाच ओलांडली. शुक्रवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात ३८९.१६ मिमी पावसाची नोंद झाली.
जिल्ह्यात आता नद्यानाल्यांना पाणी आले असून सर्वत्र शेताशिवारातही पाणीच पाणी दिसू लागले आहे. सगळीकडे शेतात हिरवी पिके दिसत असून गवतही मुबलक झाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटला आहे. गुरुवारी जिल्ह्यात १२.६९ मिमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस पाथरी (२७ मिमी) तालुक्यात, तर जिंतूर येथे शून्य टक्के पावसाची नोंद आहे. तालुकानिहाय पाऊस- परभणी ३४२.७३, पालम ३०७.४६, पूर्णा ४७८.४, गंगाखेड ३८०.२५, सोनपेठ ५४६, सेलू ३७१.५, पाथरी ४३०, जिंतूर ३३६.४६, मानवत ३०९.२३ मिमी. जिल्ह्यात या पावसाळय़ात आतापर्यंत ३८९.१६ मिमी पाऊस झाला.
संततधारेमुळे शेतकरी आता मशागतीसाठी उघडिपीची प्रतीक्षा करीत आहेत. सुरुवातीला पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना संततधारेने दिलासा दिला असला, तरीही सध्या पाऊस उघडण्याच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. पावसामुळे नदीनाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत.
गोदाकाठच्या भागाला सतर्कतेचा इशारा
गोदावरी नदीच्या लाभक्षेत्रात पडणाऱ्या संततधारेमुळे नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. गुरुवारी अल्प विश्रांती घेतल्यानंतर पावसाने रात्रीपासून पुन्हा हजेरी लावल्यामुळे शहरवासीयांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
पुनर्वसू नक्षत्रात नांदेडच्या बहुतांश भागात दिलासादायक पाऊस झाला. हिमायतनगर, अर्धापूर, माहूर, नांदेड या चार तालुक्यांत तर अतिवृष्टी झाली. पहिल्या तीन नक्षत्रांत पेरणीयोग्य पाऊस झाला. परंतु त्यानंतर पावसाने दडी मारली होती. पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. गेल्या चार-पाच दिवसांपासून जोरदार पाऊस बरसल्याने शेतकऱ्यांचा जीव भांडय़ात पडला. पावसाच्या विश्रांतीनंतर विष्णुपुरी प्रकल्पाचे दोन दरवाजे पुन्हा बंद करण्यात आले.
गोदावरी नदीची धोक्याची पातळी ३५५ची आहे. सध्या ३५२.४० पातळी असल्याने व संततधार सुरू असल्याने नदीकाठच्या जनतेला सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. विष्णुपुरी प्रकल्पातून २९७ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. विष्णुपुरी प्रकल्प शंभर टक्के भरला असला, तरी मानार व ऊध्र्व पनगंगा प्रकल्पांच्या पाणीसाठय़ात मात्र अजून वाढ झाली नाही. मराठवाडय़ातल्या अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत विष्णुपुरी प्रकल्पाची पाणीपातळी सर्वाधिक आहे.
पंचनामे करण्याचे आदेश
ज्या चार तालुक्यांत अतिवृष्टी झाली व पूर्वी अतिवृष्टी झालेल्या दोन तालुक्यांत पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. मुखेड, भोकर, उमरी, हदगाव, अर्धापूर, माहूर, किनवट या तालुक्यांत हे पंचनामे होणार असल्याचे सांगण्यात आले. काल पावसाने विश्रांती घेतल्यानंतर महापालिकेने सखल भागात पाण्याचा निचरा करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या. पण काही तासांनी पुन्हा पाऊस सुरू झाल्याने या भागातील समस्या कायम आहेत. किनवट तालुक्यातील पनगंगा नदीला पूर आल्याने एका गावाचा संपर्क तुटला. शिवाय अनेक ठिकाणी शेतात पाणी शिरले होते.
तलाव तुडुंब, शेतातही तळी
जिल्हय़ात सलग पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन चांगलेच विस्कळीत झाले आहे. काही भागांत पूल वाहून गेले. गाव तलाव, सिंचन व पाझर तलाव ९५ ते १०० टक्के भरले. नदी-नाले, ओढे तुडुंब भरून वाहू लागले, तर शेतात पाणी साठल्याने जागोजागी शेततळी तयार झाली आहेत. खरीप पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
जिल्हय़ात आतापर्यंत ६०.६४ टक्के पावसाची नोंद झाली. गतवर्षी या तारखेपर्यंत २४.६१ टक्के नोंद झाली होती. वसमतमध्ये १५, तर औंढा नागनाथमध्ये ३० तलाव आहेत. पैकी २० भरून वाहत आहेत. सेनगावमध्ये ४८, कळमनुरीत २७ तलाव आहेत. पैकी १६ भरले आहेत. हिंगोली तालुक्यातील २५ तलावांपैकी ८ ओव्हर फ्लो झाले आहेत. तलाव भरले असले तरी धरणातील पाण्यात वाढ झाली नाही. परंतु शेतांना शेततळय़ाचे स्वरूप आले आहे.
वडवणीत विक्रमी पाऊस
जिल्हय़ात संततधार चौथ्या दिवशीही कायम असून शुक्रवारी सर्वत्र पावसाचा जोर वाढला. वडवणी तालुक्यात आतापर्यंत ४०४ मिमी अशी विक्रमी पावसाची नोंद झाली. चार दिवसांपासून पावसाचा मुक्काम आषाढी एकादशी दिवशीही कायम होता. यामुळे नद्या व ओढय़ांना पाणी खळखळू लागले आहे.
शहरात मात्र पावसाने नगरपालिका प्रशासनाची धांदल उडवली. सखल भागात पाणी साठले. पावसाचा जोर कायम राहिल्याने गोदावरीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पाणीटंचाईचे महत्त्व लक्षात घेऊन मोठय़ा प्रमाणात छोटे बंधारे व शेततळय़ांची कामे केली आहेत. छोटय़ा तळय़ांमध्ये पाणी भरले, मात्र मोठय़ा तलावांत अजून पाण्याचा साठा वाढला नाही. जिल्हय़ात ३६७ मिमी पावसाची नोंद झाली.