शेकडो उपग्रह वाहिन्यांद्वारे घराघरांत माहिती आणि करमणूक प्रधान कार्यक्रमांचा अहोरात्र रतीब घालणारे दूरचित्रवाणी माध्यम डिजिटलायझेशनच्या निमित्ताने पुन्हा एकदा कात टाकण्यास सज्ज असले तरी त्यासाठी आवश्यक सेट टॉप बॉक्स यंत्रणा बसवून घेण्याबाबत ठाणे जिल्ह्य़ातील  ग्राहकांनी थंड प्रतिसाद दिल्याने येथील सुस्पष्ट चित्राचे भवितव्य धूसरच आहे. ठाणे जिल्ह्य़ातील ठाणे, नवी मुंबई, डोंबिवली आणि कल्याण या चार शहरांमध्ये येत्या १ एप्रिलपासून उपग्रह वाहिन्यांचे डिजीटल प्रसारण करण्याची घोषणा माहिती आणि प्रसारण खात्याने केली आहे. त्यासाठी ३१ मार्चपूर्वी सर्व केबल ग्राहकांनी त्यांच्या दूरचित्रवाणी संचास सेट टॉप बॉक्स बसवून घेणे अनिर्वाय आहे. मात्र आता ही मुदत संपण्यास अवघे दोन दिवस उरले तरी जिल्ह्य़ातील या चार महानगरांमधील तब्बल ४० टक्क्य़ांहून अधिक केबल ग्राहकांनी सेट टॉप बॉक्स यंत्रणा बसवलेली नाही. काही ठिकाणी ग्राहकांची मागणी आहे, पण सेट टॉप बॉक्सच उपलब्ध नसल्याच्या तक्रारी आहेत. मात्र एकुणात या नव्या बदलाबाबत प्रेक्षकांमध्ये  उदासीनताच अधिक असल्याचे दिसून येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाणे शहरातील जेमतेम ५० टक्के केबल ग्राहकांनी सेट टॉप बॉक्स यंत्रणा बसवली आहे. नवी मुंबईतही तशीच परिस्थिती आहे. कल्याण-डोंबिवलीत तर सेट टॉप बॉक्स बसवून घेणाऱ्या ग्राहकांची प्रमाण त्यापेक्षाही कमी आहे. त्यामुळे जिल्ह्य़ातील डिजीटल प्रसारणाचा मुहूर्त लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.  
डिजीटल प्रसारण शासनाच्या पथ्यावर
अनेक केबल व्यावसायिक त्यांच्या जोडण्यांची संख्या कमी दाखवून शासनाचा महसूल बुडवितात. डिजीटल प्रसारण यंत्रणेत प्रत्येक सेट टॉप बॉक्सची नोंदणी अनिवार्य असल्याने त्यांना तसे करता येणार नाही. परिणामी शासनाच्या महसुलात लक्षणीय वाढ होणार आहे. सध्या ठाणे जिल्ह्य़ातून शासनास केबल जोडण्यांमधून दरमहा १ कोटी ९० लाख तर डायरेक्ट टु होम अर्थात डिटीएच सेवेतून दोन कोटी रुपये कर मिळतो. संपूर्ण डिजीटल प्रसारण सुरू झाल्यानंतर या व्यवहारात पारदर्शकता येऊन शासनाच्या महसुलात भरघोस वाढ होणार आहे.
ग्राहकांना निवडीचे स्वातंत्र्य नाहीच..
केबल व्यवसायातील मक्तेदारीमुळे ग्राहकांना कधीही वाहिन्या निवडण्याचे स्वातंत्र्य नव्हते. सेट टॉप बॉक्स बसविल्यानंतरही आवडीच्याच वाहिन्या पाहण्याचे स्वातंत्र्य ग्राहकांना मिळणार नाही. एखादी आवडती वाहिनी पाहण्यासाठी त्या संचातील इतर नकोशा वाहिन्यांचाही भार ग्राहकांना यापुढेही सोसावा लागणार आहे. ग्राहकांकडून या योजनेला मिळत असलेला थंड प्रतिसादाचे हेही एक कारण आहे. त्यात सध्या वार्षिक परीक्षांचा काळ असल्याने तसेही घरातील टी.व्ही. संचाकडे दुर्लक्षच केले जाते. काही ग्राहक तर या काळात तात्पुरत्या स्वरूपात केबल जोडण्या खंडीतही करतात. त्यामुळे ३१ मार्चची मुदत ग्राहकांनी फारशी गांभीर्याने घेतली नसल्याचे बोलले जाते.
केबलपेक्षा डीटीएचला पसंती
ग्राहकांमध्ये एकूणच केबल व्यावसायाविषयी संभ्रम आणि संशय आहे. त्यातूनच ‘गडय़ा अपुला अ‍ॅन्टेना बरा’ अशा मनोवृत्तीतून थोडे जादा पैसे मोजून ग्राहक ‘डायरेक्ट टु होम’ अर्थात डीटीएच किंवा डिश अ‍ॅन्टेनाचा पर्याय स्वीकारीत आहे. सध्या ठाणे जिल्ह्य़ात केबल ग्राहकांपेक्षा डिटीएच ग्राहकांची संख्या लाखाहून अधिक आहे. जिल्ह्य़ात सध्या ४ लाख ६५ हजार ६०० केबल ग्राहक तर ५ लाख ७५ हजार डीटीएच ग्राहक आहेत.