भुमी अभिलेख कार्यालयातील भ्रष्ट व अनागोंदी कारभाराचा आज आमदार विजय औटी यांनी पर्दाफाश केला. दरम्यान, पैसे घेऊन पावती न देणे, ई-मोजणीच्या कामासाठी खाजगी व्यक्तीची नेमणूक केली अशा तक्रारीत तथ्य आढळल्याने जिल्हा अधिक्षक धनाजीराव धायगुडे यांच्या आदेशानुसार या कार्यालयातील कर्मचारी संजय डोळस तसेच मुख्य सहाय्यक ए. एस. दहिफळे यांच्याविरूध्द पोलीस ठाण्यात लगेचच गुन्हा दाखल करण्यात आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
या कार्यालयात प्रत्येक कामासाठी नागरीकांची अडवणूक होत असल्याच्या औटी यांच्या कार्यालयाकडे शेकडो तक्रारी आल्या होत्या. या तक्रारींचा संदर्भ देऊन कारवाईचा अहवाल सादर करण्याचे पत्र त्यांनी कार्यालयाचे प्रभारी उपाधीक्षक व्ही. एम. सावनकर यांना पुर्वीच दिले होते. मात्र त्यावर कार्यवाही न झाल्याने औटी यांनी सावनकर यांच्या दालनात कार्यकर्त्यांंसह धरणे देत प्रत्येक तक्रारीचा खुलासा मागितला. कार्यालयात त्यावेळी २३ पैकी केवळ ८ कर्मचारी उपस्थित होते. कार्यालयाच्या हजेरीपुस्तकातही सावळा गोंधळ असल्याचेच स्पष्ट झाले. या प्रकाराने संतप्त झालेल्या औटींनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना येथे पाचारण करण्याची मागणी केली. अखेर नगरहून जिल्हा अधीक्षक धनाजीराव धायगुडे येथे आले. त्यानंतर तर कर्मचाऱ्यांच्या गलथान कारभारासह भ्रष्टाचाराचीही प्रकरणे पुढे आली. ती पाहून धायगुडे हेही थक्क झाले. त्यांनी डोळस व दहिफळे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले व अन्य कर्मचाऱ्यांच्या खातेअंतर्गत चौकशीचे आश्वासन दिले.