सोलापुरात हजारो बेकायदा बांधकामे असून त्यापकी नियमित करता येणे शक्य आहे, अशी बांधकामे नियमित केली जातील. मात्र नियमित करता येणार नाहीत अशा बेकायदा बांधकामांविरुद्ध कठोर कारवाई करणे, सोलापूर महापालिका प्रशासनाला क्रमप्राप्त ठरणार आहे. यात फौजदारी कारवाई करणे आपणास पसंत राहील. अशी स्पष्ट भूमिका पालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी मांडली.
शहरातील बांधकाम व्यावसायिक, विकसक व वास्तुविशारद यांची बठक पालिका सभागृहात महापौर अलका राठोड यांच्या उपस्थितीत झाली. त्या वेळी आयुक्त गुडेवार यांनी बेकायदा बांधकामांबाबत खडे बोल सुनावले. शहरात आतापर्यंत बांधकामे उभारताना जे झाले ते झाले. दोषींवर काय कारवाई करायची आणि यापुढे कोणत्या पद्धतीने कामकाज चालवायचे, याच्या सूचना तुम्हीच द्या, असे आवाहन आयुक्त गुडेवार यांनी केले. तेव्हा बांधकाम व्यावसायिकांनी आपल्या अडचणी मांडत काही सूचना केल्या. बेकायदा बांधकामांचा मुद्दा चच्रेला आला, तेव्हा गुडेवार यांनी अवैध ते अवैधच, आपणास अवैध कामे आवडत नाहीत. मात्र चुकांबद्दल फौजदारी कारवाई करणे आवडते, अशा शब्दांत ठणकावले. त्याच वेळी अशा अवैध बांधकामाबाबत कोणती भूमिका घ्यायची याची सूचना तुम्हीच द्या, असे सांगून आयुक्तांनी आपला चेंडू बांधकाम व्यावसायिक, विकसक व वास्तुविशारदांच्या कोर्टात परतवला. सारीच बांधकामे आणि व्यावसायिक बेकायदा नाहीत. तर अनेक प्रकरणे पालिका प्रशासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आली असून, त्यावर वेळेवर कार्यवाही होत नाही अशी तक्रार आयुक्तांकडे करण्यात आली.