चालू वर्षांसाठी ५ अब्ज ९४ कोटी ८४ लाखांच्या जिल्हा कर्ज नियोजन आराखडय़ास मंजुरी दिल्यानंतर सर्व बँकांनी पीककर्जाचे उद्दिष्ट जूनअखेपर्यंत पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम यांनी संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यांना केले.
जिल्हाधिकारी पोयाम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत चालू आर्थिक वर्षांचा पीककर्जाचा आराखडा मंजूर करण्यात आला. यात ४ अब्ज १ कोटी १४ लाखांची तरतूद पीककर्जासाठी करण्यात आली. या वेळी नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक एस. एस. गरुडे, अग्रणी बँकेचे प्रबंधक युवराज शहारे उपस्थित होते. शेतक ऱ्यांचे हित लक्षात घेऊन सर्व बँक अधिकाऱ्यांनी जूनअखेपर्यंत पीककर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून शेतक ऱ्यांचा फायदा होईल. गतवर्षी २ अब्ज ३६ कोटी ९० लाखांचे उद्दिष्ट दिले होते. बँकांनी ३ अब्ज ८२ कोटी १३ लाखांचे वाटप करून १६१ टक्के उद्दिष्ट पूर्ण केल्याने बँक अधिकाऱ्यांचे पोयाम यांनी अभिनंदन केले. बँकनिहाय कर्जवाटपाचे नियोजन मंजूर केल्याचेही त्यांनी सांगितले.