धारणी येथील एकात्मिक प्रकल्प आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी प्रदीप पी. यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांना नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा येथील पारधी समुदायाच्या महिलांनी चप्पलांनी मारहाण केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. या महिलांनी अचानकपणे हल्ला केल्याने कार्यालयात एकच गोंधळ उडाला. घरकूल योजनेच्या कामाविषयी माहिती जाणून घेण्यासाठी या महिला प्रकल्प कार्यालयात पोहोचल्या होत्या, अशी माहिती मिळाली आहे.
याप्रकरणी धारणी पोलिसांनी बारा महिलांना ताब्यात घेतले असून वृत्त लिहेपर्यंत त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती. धारणीच्या एकात्मिक प्रकल्प आदिवासी विभागाच्या कार्यालयात या महिला अचानक शिरल्या आणि थेट प्रदीप पी. यांच्या कक्षात जाऊन त्यांनी घरकूल योजनेतून आम्हाला घरे अजूनपर्यंत का मिळाली नाहीत, असा सवाल त्यांनी केला. महिलांचा आरडाओरड एोकून इतर कर्मचारी प्रदीप पी. यांच्या कक्षाकडे धावले. त्यांनी या महिलांना कक्षाबाहेर काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा महिलांनी प्रदीप पी. यांच्यासह सहायक प्रकल्प अधिकारी डी.डी. मोरे आणि लेखा अधिकारी हिरजाळे यांना चप्पलांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनेची सूचना धारणी पोलिसांना लगेच देण्यात आली. धारणीचे ठाणेदार अंबादास हिवाळे यांच्यासह पोलिसांचे पथक लगेच कार्यालयात पोहोचले, त्यांनी या महिलांना ताब्यात घेतले.
मंगरूळ चव्हाळा येथून या महिला थेट धारणी येथे कशा पोहोचल्या आणि त्यांनी थेट प्रकल्प अधिकाऱ्यांना मारहाण का केली, हे कोडे पोलिसांनाही पडले आहे. पोलिसांनी या महिलांकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. प्रकल्प कार्यालयातील एका निरीक्षकाने तीन महिन्यांपूर्वी घरकूल योजनेतून घरे मिळवून देण्याचे आमीष दाखवून या महिलांकडून रक्कम उकळली होती. मध्यंतरीच्या काळात कोणत्याही हालचाली न झाल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी या महिला प्रकल्प कार्यालयात पोहोचल्या, अशी माहिती समोर आली आहे. सहायक प्रकल्प अधिकारी डी.डी. मोरे यांच्या तक्रारीच्या आधारे धारणी पोलिसांनी या महिलांविरोधात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.