‘तोडा, फोडा’ ही आमची संस्कृती नाही; पण अलीकडे कोणीही उठतो आणि राष्ट्रवादी नेत्यांवर आरोप करतो. आता हे आरोप सहन करू नका. राष्ट्रवादी नेत्यांवर आरोप करणा-यांच्या गाडय़ा फोडा,’ असा आदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष उमेश पाटील यांनी ज्येष्ठ मंत्र्यांसमोरच झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काढलेला विकासरथ कोल्हापुरात दाखल झाला. रॅलीत प्रदेश अध्यक्ष उमेश पाटील, के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्रामसिंह कुपेकर, शहराध्यक्ष आदिल फरास यांच्यासह नेते सहभागी झाले होते. कावळा नाका येथून रथयात्रा स्टेशन रोड, व्हीनस कॉर्नर, दसरा चौक, िबदू चौकमाग्रे केशवराव भोसले नाटय़गृह येथे आली. तेथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला.
ते म्हणाले, आम्ही काय नेत्यांवर केलेल्या आरोपाबाबत केवळ वृत्तपत्रात आलेल्या हेडलाईन वाचत बसायचे काय? आता हे सहन करू नका. आरोप करणा-यांचे हात-पाय मोडा. त्यांच्या गाडय़ाही फोडा, आम्ही विकासाच्या मुद्दय़ावर भर दिला आहे, गुद्दय़ावर नाही. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसने केलेली विकासकामे जनतेसमोर येण्यासाठी ही विकास रथयात्रा काढली आहे.  
‘मनसे’सह शिवसेनेवर चौफेर टीका केली. ते म्हणाले, राज ठाकरे यांनी मोठमोठय़ा सभा घेऊन हवा केली; पण ती हवेतच विरली. त्यानंतर नरेंद्र मोदी आले आणि त्यांनी गुजरातच्या विकासाचा मुद्दा उपस्थित केला; पण तशी स्थिती नाही. गुजरातपेक्षा अधिक विकास महाराष्ट्रात झाला आहे. आता नरेंद्र मोदी गेले आणि ‘आप’ आले; पण त्यांच्याकडे विकासाचा मुद्दा नाही. राज्याचा विकास केवळ राष्ट्रवादीच करू शकते, हा संदेश तुम्ही जनतेपुढे घेऊन जावा. असे आवाहन त्यांनी केले. खा. राजू शेट्टी यांच्यावरही त्यांनी जोरदार टीका केली. ऊसदर आंदोलन करून खा. राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांनी शेतक-यांची दिशाभूल केली आहे. त्यांनी ‘आरएसएस’बरोबर हातमिळवणी केल्याने त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे, असा आरोपही त्यांनी केला.
कामगार मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, आजच्या रॅलीमुळे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. मुस्लिम, िलगायत समाजास आरक्षण देऊन त्यांचा विकास केला जाईल. त्यांना आíथक उन्नतीबरोबरच नोकरीत प्राधान्य दिले जाईल. कृषिमंत्री शरद पवार यांच्या पुढाकाराने शेतक-यांची  कर्जमाफी झाली आहे. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवारच विजयी होतील. त्यासाठी प्रसंगी दोन्ही काँग्रेस एकत्र लढू; पण राष्ट्रवादीचाच उमेदवार निवडून आणू.
 के. पी. पाटील म्हणाले, गेल्या लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव जिव्हारी लागला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दोन्ही जागा निवडून आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. यावेळी महापौर सुनीता राऊत, जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले, माजी जि. प. अध्यक्ष बाबूराव हजारे, भया माने व मान्यवर उपस्थित होते. स्वागत शहराध्यक्ष आदिल फारस यांनी, तर प्रस्ताविक संग्रामसिंह कुपेकर यांनी केले. आभार करवीर अध्यक्ष हंबीरराव पाटील यांनी मानले.