शास्त्रीय गायन, शास्त्रीय नृत्य आणि बासरी वादन यांची एकत्रित जुगलबंदी पाहण्याची संधी मुंबईकरांना उपलब्ध झाली आहे. २६ जानेवारी २०१४ रोजी सायंकाळी सात वाजता सेंट झेविअर्स महाविद्यालयाच्या प्रांगणात होणाऱ्या ‘त्रिधारा’ या कार्यक्रमात ज्येष्ठ नर्तक पं. बिरजू महाराज, ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरासिया व शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रवर्ती सहभागी होणार आहेत.
सेंट झेविअर्स महाविद्यालयाच्या इंडियन म्युझिक ग्रूपतर्फे आयोजित ‘येस बॅंक-आयएमजी-जॅनफेस्ट’ च्या दोन दिवसांच्या महोत्सवाची सांगता या ‘त्रिधारा’ने होणार आहे. २५ आणि २६ जानेवारी रोजी होणाऱ्या या महोत्सवात रसिकांना संगीताची मेजवानी मिळणार आहे.
दस्तुरखुद्द पं. चौरासिया यांनाही ‘त्रिधारा’ची ही संकल्पना आगळी वाटली आहे.  या महोत्सवाबाबत माहिती देण्यासाठी सेंट झेविअर्स महाविद्यालयाच्या कॉन्फरन्स सभागृहात शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेस पं. चौरासिया यांच्यासह ‘येस बॅंके’चे विपणन प्रमुख अमित शाह, महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. आशा नाथानी-दायना, महोत्सवाच्या आयोजनातील विद्यार्थी प्रतिनिधी अभिनय भसीन आदी उपस्थित होते.
‘त्रिधाराबाबत बोलताना पं. चौरासिया म्हणाले की, नृत्य आणि संगीत यांची एकत्रित जुगलंबदी यापूर्वी झालेली आहे. पहिल्यांदाच यात शास्त्रीय गायनाचा समावेश करण्यात आला असून नृत्य, वादन आणि गायन असा तिहेरी योग साधला गेला आहे.
भारतात असा प्रयोग पहिल्यांदाच होत असावा. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी २५ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता प्रसाद खापर्डे यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. तर त्यानंतर ‘राकेश अॅण्ड फ्रेंड्स’ यात राकेश चौरासिया (बासरी), विनायक पोळ (ड्रम), सत्यजित तळवलकर (तबला), शेल्डन डिसिल्वा (बास गिटार), संगीत हळदीपूर (की बोर्ड), संजय दास (गिटार) हे सहभागी होणार आहेत. तर २६ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता उस्ताद रशिद खान यांचे सतार वादन होणार असल्याची माहितीही या पत्रकार परिषदेत देण्यात आली.