आदिवासी वाळू वाहतूकदार रेवजी मेंगाळ हत्या प्रकरणातील आरोपींना चोवीस तासात अटक करून त्यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचाही गुन्हा दाखल करण्यात येईल, मयताच्या कुटुंबियांसाठी शासनाकडे मदतीचा प्रस्ताव पाठविण्याच्या अश्वासनानंतर देसवडे येथील मुळा नदीपात्रातील ग्रामस्थ व प्रशासनातील तणाव आज दुपारी अडीचच्या सुमारास निवळला. तब्बल ४० तासांनी नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेऊन उशिरा त्यावर अंत्यसंस्कार केले.
दरम्यान, जांबूत येथील ग्रामस्थांनी पोलिस प्रशासनावर दबाव आणून महसूल कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यास भाग पाडले असते तरी या प्रकरणाचे दुसरे रूप पोलीस तपासातच पुढे येईल असे जाणकार पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मेंगाळ यांची हत्या झाली त्या दिवशी महसूल खात्याचे पथक देसवडे शिवारात आले होते, मात्र हत्येमागे महसूल पथकाऐवजी दुसऱ्याच शक्तींचा हात असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. महसूलच्या पथकाने मारहाण करून मेंगाळ यांचा मृत्यू झाला असता तर मेंगाळ यांच्याकडे असलेला ट्रॅक्टर घटनास्थळावरून गायब कसा झाला, याबाबत प्रत्यक्षदर्शी व ग्रामस्थ यांच्याकडून सांगण्यात येणाऱ्या माहितीत प्रचंड विसंगती असल्याचे पोलिसांनी सांगितले. मेंगाळ यांच्या मृत्यूचे भांडवल करून स्वत:ची पोळी भाजून घेण्याचा काहींचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येते. पोलिसांशी संघर्ष करणाऱ्यांमध्ये वाळूचा बेकायदेशीर उपसा करणाऱ्या ग्रामस्थांचाच बहुसंख्येने समावेश होता. महसूल प्रशासनास बदनाम करून देसवडे येथील ठेका बंद पाडायचा व तेथील वाळूचा बेकायदेशीरपणे उपसा करण्याची त्यामागे अटकळ आहे की काय याचाही तपास घेतला जात आहे. याच नदीपात्रातून जांबूत येथील वाळूतस्करांनी मोठय़ा प्रमाणात वाळूचा उपसा केला असून याच गावाच्या हद्दीत वाळूसाठा करून ठेवल्याचेही गुरूवारी निदर्शनास आले होते.
काल (गुरूवार) सायंकाळी पोलिसांच्या वाहनावर दगडफेक करून शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी जांबूत (ता. संगमनेर) येथील तिघांसह २५० ते ३०० लोकांविरूध्दही पारनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेंगाळ याच्या मृत्यूप्रकरणी महसूल खात्याच्या पथकातील पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी पोलिस तपासात या घटनेचे वेगळेच रूप बाहेर येण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.
गुरूवारी रात्री रेवजी मेंगाळ याचा मृतदेह मुळा नदीपात्रात अढळून आल्यानंतर शुक्रवारीही नदीपात्रात कमालीचा तणाव होता. महसूल पथकातील कर्मचाऱ्यांनीच मेंगाळ याचा खून केल्याचा आरोप करीत पथकातील कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी जांबूत ग्रामस्थांनी आक्रमक भुमिका घेतली होती़  अखेर नाना भाउ मेंगाळ यांच्या फिर्यादीनुसार महसूलच्या पथकातील कर्मचाऱ्यांवर  गुन्हा दाखल करण्यात आल्याचे उपाधीक्षक घुगे यांनी नदीपात्रातच जाहीर केले. त्यानंतर जमाव शांत होउन मृतदेह ताब्यात घेतला जाईल अशी अपेक्षा होती, मात्र गुन्हा दाखल होउनही आरोपींना ताब्यात घेण्याची मागणी पुढे करण्यात येउन ग्रामस्थांनी आडमुठी भूमिका घेतली.
अखेर आज दुपारी अतिरिक्त पोलीस अधिक्षक सुनिता साळुंके-ठाकरे यांनी पुढाकार घेऊन लहानू खेमनर, शिवसेनेचे संगमनेर तालुकाप्रमुख बाबासाहेब कुटे यांच्यासह प्रमुख ग्रामस्थांशी चर्चा करून वरीलप्रमाणे अश्वासने दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यास ग्रामस्थ राजी झाले, त्यानंतर मुळा नदीपात्रातील दोन दिवसांपासूनचा तणाव निवळला. जिल्यातील दहा पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांसह त्यांचा स्टाफ या परिसरात उपस्थित होता.