राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या सोयींकरिता व उत्तरपत्रिकांच्या फेरतपासणीच्या लांबलचक प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी उत्तरपत्रिकांची १५० रुपयांत फेरतपासणी करावी किंवा विद्यार्थ्यांना सत्यप्रत सुविधा द्यावी, अशी शिफारस राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांना डीन समितीने केली.
डीन समितीचा अहवाल सादर होऊन १ महिन्यांचा कालावधी लोटला; परंतु कोणताही निर्णय अजूनपर्यंत घेण्यात आला नाही. समितीच्या शिफारशी लागू केल्यानंतर उत्तरपत्रिकांच्या फेरतपासणीला लागणारा कालावधी आणि त्यातील होणारे गैरप्रकार संपुष्टात येईल, असे समितीच्या सदस्यांनी विश्वास दर्शविला आहे. तत्कालीन कुलपती आणि राज्यपाल पी.सी. अलेक्झांडर यांनी नागपूर विद्यापीठात १९९९ ला झालेल्या कोहचाडे प्रकरणामुळे राज्यातील सर्व विद्यापीठामधून थेट फेरमूल्यांकन हद्दपार करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर राज्यातील विद्यापीठांना फेरमूल्यांकनासाठी नवा फॉम्र्युला देण्यात आला. विद्यार्थ्यांनी आधी उत्तरपत्रिकांची सत्यप्रत घ्यावी आणि नंतर कमी गुण मिळाले असतील तर मूल्यांकनाला आव्हान द्यावे, अशी ही पद्धत आहे. परंतु ही पद्धत लागू झाली तेव्हापासून योग्यरीत्या राबविण्यात आली नाही. विद्यार्थ्यांंना याचा फटका बसला. बरेचदा तीन ते चार महिने उशिरा फेरमूल्यांकनाचे निकाल लागले. त्यामुळे त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांना हायकोर्टात जावे लागले. सिनेटमधील पदवीधरांच्या प्रतिनिधींनी पुन्हा थेट फेरमूल्यांकन सुरू करावे, अशी मागणी केली. डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली यावर कार्यवाही व्हावी यासाठी एक समिती स्थापन केली. या समितीने उत्तरपत्रिकांची १५० रुपयात थेट फेरतपासणी करण्याची सुविधा विद्यार्थ्यांना देण्यात यावी, अशी शिफारस केली. त्यासाठी उत्तर पत्रिकांची सत्यप्रत मागण्याची गरज विद्यार्थ्यांना नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचा ५०० रुपयांचा अतिरिक्त खर्च वाचणार आहे. उत्तरपत्रिकांची सत्यप्रत किंवा फेरमूल्यांकन यापैकी एकच पर्याय विद्यार्थ्यांना निवडता येईल. एकाचवेळी दोन्ही सुविधा घेता येणार नाही, असे समितीच्या अध्यक्षांनी स्पष्ट केले. यावर्षीपासून ही पद्धत लागू करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती प्र कुलगुरू डॉ. महेशकुमार येन्की दिली.