चंदगड विधानसभा पोटनिवडणुकीसाठीची अधिकृत मतदार यादी बुधवारी जाहीर करण्यात आली. या निवडणुकीसाठी २ लाख ८६ हजार २०० स्त्री-पुरुषांचा मतदार यादीमध्ये समावेश आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष बोरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. चंदगड विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक २७१ आहे. या मतदारसंघात ३४५ मतदान केंद्रांची संख्या आहे. यापूर्वी पुरुष मतदार १ लाख ३८ हजार ५७२ व स्त्री मतदार १ लाख ३६ हजार ९७८ होते. १५जानेवारी रोजी सुधारित अंतिम यादी निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार पुरुष मतदार संख्या १ लाख ४४ हजार ५६० व महिलांची संख्या १ लाख ४१ हजार ७४० इतकी आहे. त्यामध्ये १० हजार ६७५ इतकी नव्याने वाढ झाली आहे, असे बोरकर म्हणाले.
दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात आज आदर्श आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी आढावा बैठक जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी राजाराम माने यांच्या अध्यक्षतेखाली झाली. ११ जानेवारीपासून संपूर्ण जिल्ह्य़ात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्याच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी सर्व शासकीय यंत्रणांनी निवडणूक आयोगातर्फे देण्यात आलेल्या सूचनांचे सतर्कतेने पालन करावे, अशा सूचना माने यांनी दिल्या.    
बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, अप्पर जिल्हाधिकारी आप्पासाहेब धुळाज, सुभाष बोरकर उपस्थित होते. हद्दपारीच्या प्रकरणांचा आढावा घेऊन त्याचा निपटारा त्वरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सहायक निवडणूक अधिकारी तथा गडहिंग्लजचे प्रांताधिकारी विवेक आगवणे यांनी आभार मानले. यावेळी सर्व शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.