मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोलापुरातील जाहीर सभेत बोलताना केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह टीकेबद्दल त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने करीत ठाकरे यांच्या प्रतीकात्मक पुतळय़ाचे दहन केले. मात्र पोलिसांनी या वेळी हस्तक्षेप करून ३२ कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.
गेल्या शुक्रवारी येथील नॉर्थकोट प्रशालेल्या मैदानावर झालेल्या जाहीर सभेत राज ठाकरे यांनी पवार काका-पुतणे तसेच केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली होती. ठाकरे यांचे वक्तव्य आक्षेपार्ह व खालच्या पातळीवरील असल्याने आमच्या भावना दुखावल्या आहेत, अशी प्रतिक्रिया जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष संतोष पवार यांनी व्यक्त केली. ही प्रतिक्रिया सार्वत्रिक स्वरूपात व्यक्त होण्यासाठी चार हुतात्मा पुतळय़ांजवळ राष्ट्रवादीच्या युवक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन राज ठाकरे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. या वेळी राज ठाकरे यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्यात आला. मात्र पोलिसांनी लगेचच हस्तक्षेप करून जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्यासह ३२ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. नंतर सर्वाना सोडण्यात आले.
दरम्यान, संतोष पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त प्रदीप रासकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. राज ठाकरे यांचे वक्तव्य अश्लाघ्य असून ते लोकशाहीने घालून दिलेल्या चौकटीत बसत नसल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली. ठाकरे यांच्या भाषणाची सीडी तपासून तसेच विधी अधिकाऱ्यांचा अभिप्राय घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल, असे स्पष्टीकरण पोलीस सूत्रांकडून देण्यात आले.