ग्राहकांना आठ दिवसांच्या आत महावितरणने वीजजोडणी द्यावी, अशी मागणी बहुजन स्वराज महासंघाचे प्रदेश अध्यक्ष प्रमोद नाथेकर यांनी केली आहे. महावितरणकडून ग्राहकांना वीजजोडणी देताना कागदपत्रांच्या जाचक अटी शिथिल करण्याची सूचनाही त्यांनी केली आहे. महावितरणच्या कार्यालयात महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी ठिय्या देत अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
लहान घरांमध्ये राहणाऱ्या सर्वसामान्यांची सध्याची परिस्थिती अतिशय नाजूक आहे. वाढती महागाई लक्षात घेता त्यांना उदरनिर्वाह करणेही मुश्कील झाले आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांना नवीन वीज जोडणी घेण्यासाठी महावितरणचे अधिकारी अनेक फेऱ्या मारावयास लावतात. त्यामुळेच अनेक जण वीजजोडणी घेणे टाळतात.
नवीन वीजजोडणी देताना काही जाचक कागदपत्रांच्या अटी शिथिल करून नवीन वीज ग्राहकास जास्त फेऱ्या मारावयास न लावता अर्ज दाखल झाल्यापासून आठ दिवसांच्या आत जोडणी देण्यात यावी, अशी मागणी महासंघाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन देण्याआधी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयात ठिय्या दिला. प्रमोद नाथेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.