मराठी विद्यापीठ होण्याइतकेच ते विदर्भातच होणे आवश्यक आहे, अशी मागणी विदर्भ सांस्कृतिक आघाडीने केली आहे. विदर्भातील सर्वपक्षीय राजकीय नेतृत्वाने उदासीनता सोडून मराठी विद्यापीठ विदर्भातच स्थापले जावे, असा आग्रह धरावा तसेच भाषा सल्लागार समितीतील विदर्भाच्या प्रतिनिधींनीही यासाठी प्रयत्न करावे, अशी अपेक्षाही आघाडीने व्यक्त केली आहे.
विदर्भाने काहीही मागितले की विदर्भेतरांना ते भांडण करणे वाटते, ही मानसिकता तातडीने बदलण्याची गरज आहे. मराठी विद्यापीठाच्या मागणीचे उगमस्थान नागपूरच आहे. ८० वर्षांपूर्वी आणि २००७ मध्ये झालेल्या ८० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून तसेच विदर्भ साहित्य संमेलनातूनही वेळोवेळी मागणी करून डॉ. वि.भि. कोलते यांच्यापासून तर प्रा. राम शेवाळकर, डॉ. भा.ल. भोळे, डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी व आता विदर्भ आणि महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीने मराठी विद्यापीठाची मागणी सतत प्रकाश झोतात राखली आहे. राज्याच्या मराठी भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनी ‘मराठी विद्यापीठ कुठे असावे यापेक्षा ते असणे महत्त्वाचे’ असे विधान केले आहे. हे विद्यापीठ विदर्भातच असावे या मागणीपासून लोकांचे लक्ष विचलित करणारे हे विधान आहे, असे विदर्भ सांस्कृतिक आघाडीने म्हटले आहे.