कराड येथील वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात हार्नियाच्या शस्त्रक्रियेसाठी डॉ. सुरेश पवार यांनी रुग्णाकडे ७ हजारांची मागणी केली आहे. बाहेर ही शस्त्रक्रिया करण्यासाठी किमान १५ हजार इतका खर्च येतो, मी ही शस्त्रक्रिया ७ हजारांत करतो, असे संबंधित डॉक्टरने सांगितले असल्याचा आरोप पंचायत समितीच्या सभेत सदस्या अश्विनी लवटे यांनी केला. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती देवराज पाटील तर, उपसभापती विठ्ठलराव जाधव, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
लवटे यांच्या आरोपाबाबत खुलासा करताना तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील कोरबू यांनी हार्नियाच्या शस्त्रक्रियेसाठी कराड कॉटेज हॉस्पिटलमध्ये फक्त ३०० रुपये इतके शुल्क आकारण्यात येते अशी माहिती दिली. संबंधित डॉक्टरने ७ हजार रुपये मागितल्याचे घटना घडली असेल तर त्याबाबत चौकशी केली जाईल असे आश्वासन दिले. यावर सर्व सदस्यांनी त्या डॉक्टरवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली. अनिता कदम यांनी तालुक्यातील विविध गावांमध्ये प्रलंबित असणारी पथदिव्यांची कामे त्वरित पूर्ण केली जावीत अशी मागणी केली. यावर वीजकंपनीच्या अधिाकाऱ्यांनी जिल्हा विकास निधीतून यासाठी रक्कम मिळाली नसल्याचे स्पष्टीकरण दिले. भाऊसाहेब चव्हाण यांनी शेतीसाठी त्वरित वीज जोड देण्याची मागणी केली. सभापती देवराज पाटील यांनी ग्रामपंचायतींकडून पाणी पुरवठय़ाचे वीज बिल वसूल करताना ६०:४० चा जुना रेषोच कायम ठेवण्याचे आदेश बजावले.