* नागझिऱ्यातील पर्यटन सुविधा वाढवा  
* गोरेवाडा प्राणीसंग्रहालय तातडीने उभारा
* वन्यजीवप्रेमींची ‘एनटीसीए’कडे मागणी
नव्याने स्थापन केलेल्या नागझिरा व्याघ्र प्रकल्पात तातडीने पर्यटन सुविधा वाढवणे, गोरेवाडा प्राणी संग्रहालयाची निर्मिती तातडीने करणे, तसेच ताडोबाच्या बफरझोनमध्ये वनभ्रमंतीला चालना देण्याकडे तातडीने लक्ष दिले तरच ताडोबावरील पर्यटनभार कमी होऊ शकतो व वाघाला घेरण्याचे प्रकार थांबू शकतात. त्यामुळे याकडे तातडीने लक्ष देण्याचे निर्देश वनखात्याला द्यावे, अशी मागणी येथील वन्यजीवप्रेमी संघटनांनी राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाकडे (एनटीसीए) केली आहे.
नागपुरात गोरेवाडा प्राणी संग्रहालय तातडीने सुरू होणे आवश्यक आहे. अनेक वर्षांंपासून कासवगतीने या प्राणी संग्रहालयाचे काम शासकीय स्तरावर सुरू आहे. हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्राणी संग्रहालय अनेक प्रक्रियेत व पैशाअभावी लटकलेले आहे. आता सेंट्रल झू अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाने या प्राणी संग्रहालयाच्या मास्टर प्लॉनलाही मंजुरी दिली असल्याने जवळच नागपुरात हे प्राणीसंहालय सुरू झाल्यास ताडोबावरील पर्यटकांचा भार कमी होण्यास नक्कीच मदत होणार आहे. निव्वळच गोरेवाडा नाही, तर विदर्भातील नागझिरा नवेगावबांध या नव्याने स्थापन झालेल्या व्याघ्र अभयारण्याचा जलदगतीने विकासही ताडोबावरील ताण कमी करेल. या अभयारण्यातील गावांचे पुनर्वसन कासवगतीने सुरू आहे. ताडोबाच्या बफर क्षेत्रातील गावात इको डेव्हलपमेंट समितीमार्फत होणारे वनभ्रमण ताडोबावरील भार मोठय़ा प्रमाणात कमी करू शकते. परंतु, मोठय़ा घोषणा झाल्यानंतर ताडोबाच्या बफर क्षेत्रातील बोटावर मोजल्या जाऊ शकणाऱ्या गावातच या समितीमार्फत वनभ्रमंती सुरू केली. यात ताडोबा प्रशासन अपयशी ठरले आहे. ज्या गावात असे वनभ्रमण सुरू आहे त्या गावातील आर्थिक सुबत्ताही वाढीस लागलेली आहे. परंतु, मोठी शक्यता असूनही गावातील इडीसींना चालना देत आलेली नाही, हे खरे आहे. ताडोबाला वर्षभर पर्यटनासाठी सुरू ठेवणे हाही उन्हाळ्यातील गर्दीवर एक उपाय होऊ शकतो.
ताडोबाच्या निर्मितीपासून २०११ पर्यंत ताडोबा पर्यटकांसाठी वर्षभर सुरू असायचा. याबाबत ताडोबा हा भारतातील एकमेव व्याघ्र प्रकल्प आहे व याला ताडोबातील भूरूपीकीय परिस्थिती कारणीभूत आहे. पावसाळ्यातील पर्यटन सुरू झाल्यास उन्हाळ्यातील गर्दी नक्कीच कमी होणार आहे. निव्वळच ताडोबा पर्यटकांना दाखवण्यापेक्षा ताडोबाजवळील इतर दर्शनीय स्थळेही पर्यटकांना दाखविल्यास ताडोबावरील भार कमी होणार आहे. मोहुर्ली येथील तलावावर देश विदेशातील पक्षी हेही पर्यटकांचे आकर्षण असते. येथे पक्षी अभयारण्यासाठी मोठीच संधी आहे. अशीच स्थिती चारगाव धरण, चंदई प्रकल्प, जुनोना तलाव, नलेश्वर तलावावर उपलब्ध आहे. हे सर्व तलाव ताडोबाच्या अवतीभोवतीच आहेत. या सर्व तलावांजवळ वन्यजीवही उपलब्ध आहे. रामदेगी, सातबहिणी या विविध भागात निसर्ग पर्यटनासोबतच एडव्हेंचरलाही वाव आहे. याचाही विचार वनविभागाने आता करण्याची वेळ आली आहे. ताडोबातील पर्यटकांचा धुडघूस कमी करावयाचा असेल तर एकीकडे पार्कचे नियम अधिक कडक करणे जितके आवश्यक आहे, तितकेच मुळातच पर्यटकांची गर्दी जास्त होऊ नये, यासाठी दीर्घकालीन उपाययोजना आवश्यक आहेत, असे ग्रीन  प्लॅनेटचे   योगेश दुधपचारे यांनी सांगितले.