आगामी ४ महिन्यांचे जिल्हा प्रशासनाने दिलेले चारा नियोजन चुकीचे आहे, प्रशासनाला अपेक्षित चारा उत्पादन होऊ शकत नाही, त्यामुळे सध्या सुरू असलेली ऊसतोडणी थांबवावी अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांच्याकडे केली.
सेनेचे दक्षिण व उत्तर जिल्हा प्रमुख अनुक्रमे शशिकांत गाडे, रावसाहेब खेवरे, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, नगर तालुका प्रमुख संदेश कार्ले, रामदास भोर यांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली व त्यांना निवेदन दिले. सेनेने साखर कारखाने बंदचे आंदोलन सुरू केले होते. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाने चाऱ्याचे नियोजन केले आहे असे सांगून आंदोलन मागे घ्यायला लावले, मात्र ते चारा नियोजन चुकीचे आहे असे आकडेवारी देत या शिष्टमंडळाने स्पष्ट केले.
जिल्ह्य़ात सुमारे १८ लाख जनावरे आहेत. छावण्यांमध्ये २ लाख जनावरे आहेत. या जनावरांना रोज सुमारे २७ हजार टन चारा लागतो. एप्रिल, मे व जून या महिन्यांमध्ये साधारण २४ लाख ३० हजार टन चारा लागणार आहे. उन्हाळी चारा उत्पादनाची कृषी विद्यापीठाकडून माहिती घेतली असता ज्वारीच्या पिकाची फक्त १२० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. त्यातून पुरेसा चारा उपलब्ध होणार नाही. जिल्हा प्रशासनाने शेतीसाठीचे सर्व धरणांचे आवर्तन थांबवले आहे, त्यामुळे त्यातूनही चारा मिळण्याची शक्यता नाही असे गाडे, खेवरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणले.
चाऱ्याची अशी स्थिती असतानाही जिल्ह्य़ातील मंत्र्यांचे साखर कारखाने सुरूच आहे. ऑगस्टपर्यंत पिण्याचे पाणी आरक्षित ठेवून उर्वरित पाणी शेतीसाठी दिले तर नव्याने लावण्यात आलेला उस जगेल व त्यातून जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था होऊ शकेल, मात्र जिल्हा प्रशासन यासंदर्भात निर्णय घ्यायला तयार नाही अशी टिका गाडे, खेवरे यांनी केली. उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. अजून किमान ३ ते ४ महिने पावसाची प्रतिक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे या स्थितीकडे प्रशासनाने त्वरीत लक्ष द्यावे अशी आग्रही मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.