डेंग्यूच्या साथीची चर्चा सर्वत्र सुरू असली तरी इतर विषाणूंच्या संसर्गामुळे आलेल्या तापाचे रुग्ण किमान पन्नासपटीने अधिक असल्याचे दिसत आहे. तापमानातील सततच्या चढउतारामुळे विषाणूंच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्याने मुंबईकर तापाने फणफणले आहेत. डेंग्यू, मलेरियासोबत इतर विषाणूंच्या संसर्गाकडेही लक्ष देण्याची गरज आरोग्यतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
पावसाळ्याच्या सुरुवातीला तसेच पावसानंतर थंडी सुरू होण्याआधीच्या काळात तापमानात सतत चढउतार होतात. यावेळी एका टप्प्यात पूर्ण ऋतूची कसर भरून काढणारा पावसाळा, त्यानंतर अचानक वाढलेला उष्मा, निलोफर वादळामुळे तापमानात लागलीच झालेली सहा ते सात अंशांची घट आणि पुन्हा एकदा चढलेला पारा.. यामुळे विषाणूंच्या वाढीसाठी अगदी पोषक वातावरण तयार झाले आहे. या सगळ्याचा परिणाम सध्या दिसत असून डेंग्यूच्या भीतीने साध्या तापासाठीही डॉक्टरकडे रुग्णांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. ‘ताप, खोकला आणि डोकेदुखी यामुळे त्रस्त होणारे रुग्ण डेंग्यूचीही चाचणी करून घेण्यासाठी डॉक्टरांकडे लकडा लावत असले तरी अनेकांना नेहमीचा ताप असतो,’ असे डॉ. जयेश लेले यांनी सांगितले.
प्रसारमाध्यमांमधूनही सध्या डेंग्यूचा बोलबाला असला तरी प्रत्यक्षात साध्या तापाचे रुग्ण दसपटीने अधिक आहेत. पालिकेच्या रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही हेच दाखवत आहे. सप्टेंबर महिन्यात पालिका रुग्णालयात डेंग्यूचे १६७, मलेरियाचे १३५७, टायफॉइडचे १५३ तर तापाचे ९७८६ रुग्ण दाखल झाले. ऑक्टोबरमध्येही डेंग्यूच्या १७४, मलेरियाच्या ९४८ आणि टायफॉइडच्या १५४ रुग्णांच्या तुलनेत तापाचे १०,४९० रुग्ण उपचारांसाठी आले. पालिका रुग्णालयांपेक्षा खासगी दवाखाने व नर्सिग होममध्ये जाणाऱ्यांची संख्या दुपटीहून अधिक असल्याने विषाणूजन्य तापामुळे दोन महिन्यांत आजारी पडलेल्यांची संख्या निश्चितच अधिक आहे.
‘दरवर्षी या काळात तापाच्या रुग्णांचे प्रमाण वाढत असले तरी यामुळे घाबरण्याचे कारण नाही. शरीराची प्रतिकारक्षमता वाढल्यास हा आजार दोन ते तीन दिवसात नियंत्रणात येतो. मलेरिया, डेंग्यू तसेच टायफॉइडच्या तापातही योग्य उपचारांनी आराम पडू शकतो,’ अशी माहिती डॉ. सुहास पिंगळे यांनी दिली.

डेंग्यू प्राणघातक, तरीही..
डेंग्यू आणि मलेरिया हे अधिक प्राणघातक असले तरी इतर विषाणुजन्य साध्या तापाच्या रुग्णांची संख्या पाहता मुंबईकरांना या तापाचा अधिक ताप होत आहे. साधा ताप स्वनियंत्रित असला तरी योग्य आहार व उपचारांनी तो बरा होण्यास तीन ते चार दिवस लागतात. सदैव कामात असलेल्या मुंबईकरांचे त्यामुळे तेवढेच दिवस वाया जातात, याकडेही डॉक्टर लक्ष वेधतात.