गेले दोन महिने सतत कोसळणाऱ्या पावसाने शहरातून काढता पाय घेताच साथीच्या आजारांनी डोके वर काढायला सुरुवात केली आहे. ऊन, दमट हवामान, धुके, मध्येच पावसाचे शिंतोडे या सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे डेंग्यू, सर्दी-ताप, अंगदुखी, खोकला अशा तक्रारी वाढू लागल्या आहेत. शहरात आतापर्यंत डेंग्यूचे ६८ रुग्ण आढळले असून ही संख्या वाढण्याची भीती पालिका सूत्रांनी व्यक्त केली आहे. त्यातच डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनाही कुचकामी ठरू लागल्याने डासांची उत्पत्ती मोठय़ा प्रमाणावर होऊ लागली आहे.
पावसाळा ओसरू लागताच डेंग्यूचा प्रादुर्भाव होतो. त्यानुसार सध्या मुंबईत हळूहळू डेंग्यूचे रुग्ण वाढू लागले आहेत. पालिका रुग्णालये, तसेच छोटय़ा-मोठय़ा रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या डेंग्यूग्रस्तांची आकडेवारी गोळा करण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. मात्र, असे असताना मुंबईत डेंग्यूचे केवळ ६८ रुग्ण असल्याची नोंद पालिकेच्या दफ्तरी झाली आहे. असंख्य रुग्ण छोटी रुग्णालये आणि खासगी दवाखान्यांमध्ये मोठय़ा संख्येने उपचारासाठी जात आहेत. मात्र, या रुग्णांची नोंद पालिकेच्या दफ्तरी झालेली नाही. त्यामुळे डेंग्यूग्रस्तांची नेमकी संख्या पालिकेकडेही नाही.
डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढू लागताच पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत पंचसूत्रीचा अवलंब सुरू करण्यात आला आहे. डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी गृहनिर्माण सोसायटय़ांमध्ये जाऊन जनजागृती करण्यात येत आहे. तसेच डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी धुम्रफवारणी आणि कीटकनाशक फवारणीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. डासमुक्त परिसरासाठी नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येत असल्याचा दावा करीत पालिकेच्या आरोग्य विभागातील उपकार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी मुंबईतील काही भागांमध्ये डेंग्युच्या रुग्णांची संख्या हळूहळू वाढत असल्याची कबुली दिली. डेंग्यूचा डास दिवसा चावत असल्यामुळे कार्यालये, शाळा, रुग्णालये आदी ठिकाणी उपाययोजना डास प्रतिबंधक उपाययोजना करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. डेंग्यूचे रुग्ण आढळताच त्याच्या आसपासच्या ५०० घरांमध्ये ताप अथवा डेंग्यूच्या रुग्णाचा शोध घेण्यात येत आहे. या संपूर्ण परिसराचे सर्वेक्षण करून डेंग्यूच्या साथीचा प्रादुर्भाव होऊ नये याची काळजी घेण्यात येत असल्याची माहिती डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.
काही महिन्यांपूर्वी विभागांमध्ये आठवडय़ातून एकदा धुम्रफवारणी करण्यात येत होती. मात्र, आता ती १५ दिवसांतून एकदा होऊ लागली आहे. दक्षिण मुंबईतील दाटीवाटीने उभ्या असलेल्या चाळींलगतच्या घरगल्ल्या कचऱ्याने भरल्या असून त्यात मोठय़ा प्रमाणावर सांडपाणी साचले आहे. परिणामी डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच उपनगरांमध्येही डासांची संख्या झपाटय़ाने वाढली आहे. परिणामी हळूहळू डेंग्यूचा जोरही वाढण्याची चिन्हे आहेत.