संपलेल्या आर्थिक वर्षांत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ठेवी तब्बल ५४९ कोटी रूपयांनी वाढल्या असून बँकेला २१ कोटी ८४ लाख रूपयांचा नफा झाल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष बाजीराव खेमनर यांनी शनिवारी दिली.
बँकेची ५६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज खेमनर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेत बोलताना त्यांनी वरीलप्रमाणे माहिती दिली. २५ पैकी बँकेचे नऊच संचालक या सभेला उपस्थित होते, १६ संचालक गैरहजर होते. बँकेचे उपाध्यक्ष उदय शेळके, जिल्हा उपनिबंधक दिगंबर हौसारे सभेला उपस्थित होते.
सलग दोन वर्षांतील दुष्काळी स्थितीनंतरही बँक आर्थिकदृष्टय़ा अतंयत सक्षम आहे असे खेमनर यांनी सांगितले. ते म्हणाले, दुष्काळी परिस्थितीमुळे बँकेच्या वसुलीवर काहीसा परिणाम झाला असला तरी बँकेचे एनपीए शुन्य आहे. बँकेचे स्वभांडवलही आता ५४८ कोटी रूपयांवर पोहोचले असून एकुण ठेवी ४ हजार २७२ झाल्या आहेत. संपलेल्या आर्थिक वर्षांत बँकेने २ हजार ४४४ कोटी रूपयांचे कर्जवाटप केले आहे. बँकेच्या ८६ शाखांमध्ये कोअर बँकिंग प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे, १९६ शाखा व तीन विस्तार कक्षांचे संगणकीकरणही करण्यात आले आहे. कोअर बँकिंगसाठी नगर येथील माणिक चौक शाखेत अद्ययावत टाडा सेंटर उभारण्यात आले असून रिझव्र्ह बँकेच्या सुचनेनुसार बँकेच्या सर्व शाखांमध्ये लवकरच कोअर बँकिंग प्रणाली कार्यान्वित करण्याचा प्रय्तन आहे अशी माहिती खेमनर यांनी दिली.
विषयपत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. शंभर टक्के वसुली करणाऱ्या सेवा संस्थांच्या प्रतिनिधींचा यावेळी सत्कार करण्यात आला. उपाध्यक्ष शेळके यांनी आभार मानले.