सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील व खासदार गोपीनाथ मुंडे यांनी संगनमत करून वैद्यनाथ कारखान्याने चालविण्यास घेतलेल्या ‘केदारेश्वर’सह ४ सहकारी कारखान्यांची आíथक कोंडी करून विक्रीचा घाट घातला असल्याचा थेट आरोप माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांनी केला. विरोधकच सत्ताधाऱ्यांचे वाटेकरी झाल्याने राज्यातील ४० सहकारी साखर कारखाने अत्यंत कवडीमोल भावात याच लोकांनी स्वाहा केले किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या नावाने काढलेल्या कंपन्यांनी विकत घेऊन सहकार चळवळच मोडीत काढली. या व्यवहाराची न्यायालयीन चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही ढाकणे यांनी केली.
येथे सरकारी विश्रामगृहावर पत्रकार बैठक घेऊन ढाकणे यांनी हे टीकास्त्र सोडले. ढाकणे हे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आहेत. सरकार व विरोधी पक्षांचे नेते संगनमत करून सहकारी चळवळच मोडीत काढण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.
राज्यातील ४० सहकारी साखर कारखाने जाणीवपूर्वक आíथक अडचणीत आणून कवडीमोल भावात विकले गेले. मात्र, याविरुद्ध विरोधी पक्षांचे नेते काही बोलत नाहीत. कारण यात विरोधकांनाही वाटा मिळत आहे. सहकारमंत्री पाटील जाहीरपणे सांगतात सहकारी साखर कारखाने विक्री केले जाणार नाहीत. पण प्रत्यक्षात कवडीमोल भावाने हे कारखाने विकले जात आहेत.
खासदार मुंडे अध्यक्ष असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने चालविण्यास घेतलेला बोधेगाव (तालुका शेवगाव) येथील केदारेश्वर सहकारी साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांचे पगारही केले नाहीत. शेतकऱ्यांना घोषित केलेला उसाचा भावही दिला नाही. परिणामी कर्मचाऱ्यांनी लेव्हीची साखर रोखली. त्यांना पोलीस बळाचा वापर करून तुरुंगात टाकले. मलाही तुरुंगात टाकले. राज्य बँक आता इतरही संस्थेला कारखाना चालविण्यास देत नाही. राज्य बँकेचे केवळ ३८ कोटी कर्ज आहे. या साठी आपण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सहकारमंत्री पाटील यांना भेटून आपली वैयक्तीक मालमत्ता विकून कर्ज भरण्यास तयार आहोत. मालमत्ता विकण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली. मात्र, टाळाटाळ केली जात आहे. ‘वैद्यनाथ’कडील दहा कोटी मिळावेत, या साठी साखर आयुक्तांच्या लवादाकडे पत्र देऊन ६ महिने झाले. तरी कोणताच प्रतिसाद नाही, असेही ते म्हणाले.
‘वैद्यनाथ’ने चालवण्यास घेतलेल्या पारनेर, के. के. वाघ, संत एकनाथ या कारखान्यांचीही स्थिती अशीच आहे, याकडे लक्ष वेधून कारखान्यांच्या विक्री व्यवहाराची न्यायालयीन चौकशी करुन गुन्हे दाखल केल्यास बहुतांशी राज्यकत्रे, पुढारी तुरुंगात जातील, असा दावाही ढाकणे यांनी केला. सामाजिक कार्यकर्त्यां प्रा. सुशीला मोराळे, राजेंद्र सानप आदी उपस्थित होते.