मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील अंधेरी ते दादर या टप्प्यातील नाटय़ रसिकांची क्षुधा भागवणारे दीनानाथ नाटय़गृह या रसिकांना यंदाही तहानलेलेच ठेवणार अशी चिन्हे आहेत. १ मे २०१२ पासून बंद असलेल्या या नाटय़गृहाच्या नूतनीकरणाचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. आणि ते पूर्ण होण्यासाठी आणखी सहा महिने ते एक वर्ष लागेल, असे संकेत अधिकृत सूत्रांनीच दिले आहेत.
मुंबई महापालिकेच्या मालकीच्या दीनानाथ नाटय़गृहाला सार्वजनिक बांधकाम विभागाचे रचनात्मक स्थैर्य प्रमाणपत्र (स्ट्रक्चरल स्टेबिलिटी सर्टिफिकेट) देण्यात आले नव्हते. त्यामुळे या नाटय़गृहासाठी लागणाऱ्या परवानग्यांची पूर्तता करण्यात दरवर्षी अडथळा येत होता. या नाटय़गृहाची रचनात्मक दुरुस्ती आणि उद्वाहकाचे बांधकाम यासाठी १.९ कोटी रुपयांचे कंत्राट देण्याचे ठरले होते. मात्र विविध परवानग्या नसल्याने नाटय़गृह व्यवस्थापनाने १ मे २०१२ रोजीच हे नाटय़गृह बंद करण्याचे ठरवले. त्यानंतर या दुरुस्ती कामाचे कंत्राट देण्यासाठीची निविदा प्रक्रिया पाऊण महिन्याने सुरू झाली.
ही दुरुस्ती करत असताना त्याबरोबरच असलेल्या काही जोड दुरुस्त्यांसाठी अधिक निधी उपलब्ध करून द्यावा लागत होता. त्यासाठी ऐनवेळी प्रशासनाच्या परवानग्याही घ्याव्या लागत होत्या. नाटय़गृहाला आतून रंग देणे, दुरावस्थेतील खुच्र्याची दुरुस्ती करणे, रंगभूषा कक्षाची दुरुस्ती करणे या सगळ्या गोष्टींसाठी वेगळी परवानगी अपेक्षित होती. मात्र याचा प्रस्तावित खर्च ७.५ कोटी रुपयांवर गेल्याने त्यासाठी दुसरी निविदा काढावी लागणार आहे. ही निविदा प्रक्रिया आता सुरू होणार असून त्यानंतरच हे मोठे काम सुरू होणार आहे.या कामानंतर नाटय़गृहाच्या रंगमंचावरील प्रकाशयोजना व विद्युत व्यवस्था पूर्णपणे ऑटो प्रणालीवर चालवण्यात येईल. त्याचप्रमाणे नाटय़गृहात एक छोटासा परिषद कक्षही बांधण्यात येणार असून तो वातानुकुलित असेल. मात्र हे सर्व होण्यासाठी सहा महिने ते एक वर्षांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत रसिक प्रेक्षकांसाठी नाटय़गृहाची दारे बंदच राहणार आहेत.