हिंगोली लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची उमेदवारी विद्यमान खासदार सुभाष वानखेडे यांना निश्चित झाल्याचे वानखेडे समर्थकांनी फटाके फोडून स्वागत केले. मात्र, त्यांच्या विरोधक व इच्छुकांचा भ्रमनिरास झाला. दुसरीकडे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसकडून या जागेवर दावा केला जात आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाले असताना पदाधिकारी निवडीवरून माजी आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा व गजाननराव घुगे, तसेच खासदार वानखेडे व माजी जिल्हाप्रमुख संतोष बांगर असे शिवसेनेत दोन गट पडल्याचे जिल्हाभर चित्र होते. म्हणूनच वानखेडे यांचे समर्थक जि. प. सदस्य यांनी सभागृहात विरोधकाच्या सुरात सूर मिळविल्याने शिवसेनेची एक हाती सत्ता असूनही सत्ताधाऱ्यांना जिल्हा परिषदेत विरोधकांशी जुळवून घ्यावे लागते अन्यथा सभा वारंवार तहकू ब करावी लागते.
शिवसेनेचे अंतर्गत असलेले वातावरण पाहता दोन्ही माजी आमदार गेल्या वर्षभरापासून बसपच्या हत्तीवरून उतरून शिवसेनेत दाखल झालेले डॉ. बी. डी. चव्हाण आपणच लोकसभेचे उमेदवार असल्याचा दावा करीत आहेत. साहजिकच ही मंडळी वानखेडे यांच्या वाटेतील अडथळे ठरणार असल्याचे चित्र आहे.
काँग्रेस आघाडीत मात्र दोन्ही पक्षांकडून उमेदवारीचा दावा केला जात आहे. आमदार राजीव सातव यांच्या शिफारशीचा प्रस्ताव पक्षश्रेष्ठींकडे गेल्यापासून आमदार सातव या मतदारसंघात वर्षभरापासून वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करून सतत लोकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करीत आहेत.
राष्ट्रवादीचे अॅड. शिवाजीराव जाधव हेही गेल्या सहा महिन्यांपासून मतदारसंघात विविध कार्यक्रम घेऊन लोकांशी संवाद साधून आहेत. माजी मंत्री सूर्यकांता पाटील याही मतदारसंघात संपर्क ठेवून आहेत. खासदार वानखेडे यांची उमेदवारी निश्चित झाल्याने शिवसेनेतील अंतर्गत दुरावा दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे.